
मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बँकांना शेतकरी कर्जाच्या मुद्द्यावरून चांगलंच खडसावलं आहे.
शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबील स्कोर पाहू नका, असं आम्ही वारंवार सांगितलं आहे. गुन्हे देखील दाखल केले आहेत. तरीही तुम्ही ऐकत नाही, यावर तोडगा काय काढणार ते तुम्हीच सांगा, अशा शब्दांत फडणवीसांनी बँकांना फटकारलं आहे.
राज्यस्तरीय बँकर समितीची बैठक आज पार पडली. यामध्ये ICICI, HDFC, Axis बँकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी चांगलंच फैलावर घेतलं. कोणती बँक शाखा सिबील मागत असेल, तर त्या बँकेवर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय मला तुमच्याकडून आजच हवाय, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. रिझर्व्ह बँकेने सुद्धा असेच आदेश दिले आहेत, तर उल्लंघन करणाऱ्या बँकेवर सरकारने गुन्हा दाखल केलाय, असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय.
बँकांनी शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करावे, असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावेळी दुष्काळी परिस्थिती नसल्यामुळं पीक चांगलं येणार आहे. बँकांनी अशात शेतकऱ्यांना अधिक सहकार्य करायलं हवं. महाराष्ट्रात FPO मोठ्या संख्येने असून MSMEs सुद्धा सर्वाधिक आहे. राज्यात गुंतवणुकीचा मोठा ओघ असून दावोसमधून 16 लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. महाराष्ट्र आता स्टार्टअपची राजधानी असल्यामुळे लक्ष दिल्यास मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती होईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
राज्य सरकारने याआधीही बँकांना सूचना दिल्या होत्या. शेतकऱ्यांना कृषी कर्ज देताना बँका आणि फायनान्स कंपन्या सिबिल स्कोअरची अट घालतात. त्यामुळे शेतकरी दुसरा पर्याय निवडतो अन् खासगी सावकाराकडे जाऊन बळी पडतो. त्यामुळे रिझर्व्ह बँकेंने स्पष्ट केलं होतं की, शेतकऱ्यांसाठी सिबीलची अट नाही. शेतकऱ्यांना कर्ज देताना ही अट काढून टाका, असे राज्य सरकारने याआधी देखील निर्देश दिले होते.

