अखेर चुंचाळे विकासोच्या निवडणूकीचा बिगुल वाजला

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील चुंचाळे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची सन २०२१/२२ ते २०२६/२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला असून दि.३ एप्रिल २०२२ रोजी मतदान होणार आहे. मागील वर्षी कोरोना महामारीचा संसर्ग पाहता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून निवडणूक कार्यक्रम न घेता मागील कार्यकारिणीला संबंधित विभागाकडून वाढीव कालावधी देण्यात आलेला होता.त्यामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. दि २ मार्च २०२२ पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असून तेरा जागांसाठी निवडणूक होणार आहे या संस्थेच्या निवडणुकीकडे सर्वांची लक्ष वेधले गेले आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणुका समिती नियम २०१४ चा (नियम १९)प्रमाणे राज्य सहकारी निवडणुक प्रधिकरण व जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडून विविध टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार दि.२ ते ८ मार्च २०२२ पर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहे तर दि.९ मार्च २०२२ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. दि. १० मार्च २०२२ रोजी छाननी झालेल्या उमेदवारी अर्जांची अंतिम यादी जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे दि.१०/३/२०२२ ते दि. २४ मार्च २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे त्यानंतर दि.२५ मार्च २०२२ रोजी चिन्ह वाटप करण्यात येणार आहे.

यानंतर दि.३ एप्रिल २०२२ रोजी मतदान होऊन लागलीच मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्धी पर्यंतचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक कार्यालय (यावल) येथे होणार आहे तर उर्वरित कार्यक्रमाच्या ठिकाणाबाबत नंतर जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी २९७ सभासद मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एम.बी.गाढे (सहकार अधिकारी) हे कामकाज पाहणार आहेत.

सदर निवडणूक ही १३ जागांसाठी होणार असून यात कर्जदार खातेदार प्रतिनिधी मतदारसंघ आठ, महिला राखीव दोन, इतर मागासवर्ग राखीव एक, अनुसूचित जाती- जमाती राखीव एक तर विजा/भज व विमाप्र राखीव एक यानुसार उमेदवार निवडणूक रिंगणात असणार आहे.

गेल्या कार्यकाळात या संस्थेवर शेतकरी पॅनलची सत्ता होती व त्यावेळीही निवडणुकी अगोदर बिनविरोध होण्यासाठी गावातून मोठे प्रयत्न झालेले होते. मात्र दुदैवाने त्या प्रयत्नांना अपयश आले होते. आता ही निवडणूक ही प्रत्यक्षात होणार की बिनविरोध होणार हे काळवेळ ठरवणार आहे तथापि संस्थेचे हित पाहता व गाव राजकीय मतभेदांपासून दुर रहावे व गावात ऐकोपा नांदवा याकरता यंदाची निवडणुकही बिनविरोध होण्याची नितांत गरज आहे. अशी गावात चर्चा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.