चुंचाळे , लोकशाही न्यूज नेटवर्क
यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज दि २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता यावल तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले. मात्र बोराळे येथील ग्रामस्थांनी आरक्षणाला केराची टोपली दाखवली आहे.
प्रांतधिकारी फैजपूर व यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या समवेत महसूल कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये ६३ ग्रामपंचायतींचे आरक्षण निघाले. मात्र अचंबा असा की, बोराळे येथील सरपंच आरक्षण अनुसुचित जमाती (एस.टी) प्रवर्गाचे निघाले. त्यात प्रकार असा घडला की, या गावात अनुसुचित जातीचा महिला किंवा पुरुष जातीचा एकही मतदार नसून तरी सुद्धा हे आरक्षण निघालेच कसे ? अशा प्रकारचा सवाल बोराळे येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला.
त्यानंतर तहसीलदार नाझीरकर यांनी सांगितले की, सदर आरक्षण जिल्हाधिकारी कार्यालयच्या वतीने जे आले आहे तसेच दिलें जाते, मात्र बोराळे गावातील ग्रामस्थांनी सांगितले आम्हाला हे आरक्षण मंजूर नाही, कारण आमच्या या प्रवर्गातील एकही मतदार किंवा व्यक्ती नाही.
तदनंतर बोराळे येथील ग्रामस्थ व विद्यमान उपसरपंच उज्जैनसिंग भावलालसिंग राजपूत यांनी निवेदन लिहून तहसीलदार व प्रांतधिकारी यांना दिले. या निवेदनात दिल्यानुसार, हरकत घेण्यात येते की आज रोजी तहसील कचेरी हॉलमध्ये बोराळे सरपंच पदासाठी आरक्षण काढण्यात आले असून अनुसुचित जाती (ST)हे आरक्षण निघाले आहे. तरी आमच्या गावात एकही मतदार किंवा घर नसून तरी सुद्धा अनुसुचित (एस.टी) आरक्षण निघाले असून इतर सामाजिक लोकांवर अन्याय झालेला आहे.
तरी निवडणूक आयोगाकडे राज्यातील सर्व गावनिहाय जातीची माहिती असतांना बोराळे गावांत अनु.जमातीचे आरक्षण निघाले असून तरी निवडणूक आयोग यांनी योग्य ती पडताळणी करून योग्य तो न्याय द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र निवेदन देऊन सुद्धा बोराळे सरपंच आरक्षण जैसे थे तैसेच ठेवण्यात आले आहे. सदर निवेदन हे यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व प्रांतधिकारी फैजपूर यांना देण्यात आले आहे.
यावेळी गावातील विकी वानखेडे, सुपडू संदानशिव आदीसह बोराळे येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. तर यावरून असे लक्षात येते की ग्रामस्थांनी बोराळे सरपंच आरक्षण अनुजमाती (एस.टी) ला केराची टोपली दाखवली आहे.