चोरवड येथील यात्रोत्सवास ४०० वर्षांची परंपरा

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा तालुक्यातील चोरवड हे प्रभूदत्त महाराजांचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथील यात्रोत्सवास भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला यात्रोत्सवाला सुरुवात होते. तसेच यावर्षी देखील बुधवार दि. ७ पासून यात्रोस्तवास प्रारंभ होणार आहे.

चोरवड येथे सुमारे ४०० वर्षापासून दत्त जयंती साजरी केली जाते. गावाच्या पश्चिम दिशेला श्री दत्त महाराजांच्या दोन मंदिरात स्वतंत्र लहान व मोठ्या मूर्ती इ.स. १६०२ मध्ये स्थापना करण्यात आल्या आहेत. याबाबत सांगितले जाते की, रावजी बुवा नामक व्यक्ती गावाबाहेर वास्तव करत असे. बाबा महानुभाव भिक्षुकी असल्याने बुवा भिक्षुकी करून आपला उदरनिर्वाह करीत असे. रावजी बुवा नियमित माहुर गडाची वारी करीत असे. उतरत्या वयात वारी करणे शक्य न झाल्याने त्यांनी तसे मंदिरात देवासमोर सांगितले व त्यांच्या झोळीत दोन झेंडूची फुले आली. नंतर ते चोरवडला आले असता त्या फुलांचे रुपांतर दत्तांच्या मूर्तीत झाल्याची आख्यायिका सर्वश्रुत आहे.

यापैकी मोठे दत्त मंदिर हे जवळपास १५० वर्ष छत नसताना उभे होते. सदर मंदिराचे छत एकाच रात्री बांधले गेले असे सांगितले जाते. तसेच लहान मंदिर शेजारी एक औदूंबराचे झाड असून यात्रेच्या निमित्ताने भूत पिच्छ्याच याचे डोक्यावरील उरे औदुंबराला बांधली जातात असा इतिहास मंदिराच्या बाबतीत सांगितला जातो. यामुळे पूर्ण खान्देशातून या मंदिरास दर्शनासाठी व जाऊळ, मानतासाठी हजारो भाविक दूर दुरून येथे मुक्कामी येतात. मंदिर हे महानुभाव पंथाचे एकमुखी दत्ताचे एकमेव स्थान आहे. या ठिकाणी पालखी मिरवणुकीला खूप महत्व असते.

साधारणतः आठवडाभर यात्रा चालते. चोरवड गावालगत असलेल्या परिसरात ह्या यात्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. या यात्रोत्सवासाठी पारोळा बसस्थानकावरुन जादा बसेस सोडल्या जातात. चोरवड तसेच परिसरातील नागरिक ह्या यात्रेसाठी बैलगाडीनेच येणे पसंत करतात हे या यात्रेचे वैशिष्ट आहे.

करमणुकीसाठी झुले, पाळणे व तमाशा मंडळ आदी या ठिकाणी दाखल झाले असून ते यात्रेचे आकर्षण ठरते. तसेच विविध वस्तू विक्रीची दुकाने देखील या ठिकाणी थाटलेली असतात. याञेत येणाऱ्या भाविकांना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य डॉ. हर्षल माने, ग्रामपंचायत सरपंच व ग्रामस्थांसह पोलिस प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असते.

Leave A Reply

Your email address will not be published.