१८ लाखांचे बनावट HTBT कापूस बियाणे जप्त
चोपड्यात कृषी विभागाची मोठी कारवाई
चोपडा, – चोपडा तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकाने मोठी धडक कारवाई करत तब्बल १७ लाख ८२ हजार २०० रुपये किंमतीचे बनावट HTBT कापूस बियाणे जप्त केले आहे. या कारवाईमुळे बोगस बियाणे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी नितीन नंदलाल चौधरी या संशयित आरोपीविरुद्ध बियाणे कायदा, बियाणे नियम, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गोपनीय माहितीनंतर राबविण्यात आली. विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आखण्यात आली होती.
जिल्हा भरारी पथकातील जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, जिल्हा मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी किरण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल विशाल पाटील, विद्या इंगळे, प्रकाश मथुरे आणि समा तडवी यांनी संयुक्तरीत्या ही कारवाई केली. चुंचाळे-अक्कुलखेडा रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडवर छापा टाकून १२७३ पाकिटे प्रतिबंधित कापूस बियाणे जप्त करण्यात आले.
या प्रकरणी विकास बोरसे यांनी फिर्याद नोंदवली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे करत आहेत.