Sunday, November 27, 2022

थरारक ! बिबट्यापासून वाचण्यासाठी नदीत उडी; १३ तास पुराशी जीवाची खेळी..

- Advertisement -

चोपडा (मिलिंद सोनवणे), लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

एखाद्याचे नशीब बलवत्तर असले तर साक्षात यमराजाला माघारी फिरावे लागते. असाच अनुभव चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील महिलेच्या बाबतीत आला. काळ आला, पण वेळ आली नव्हती. बिबट्यापासून बचाव करण्यासाठी तापीच्या पुरात उडी मारली व बुडत्याला केळीच्या खोडाचा आधार मिळाला अन् तिचे प्राण वाचले, तब्बल १३ तास पाण्यात वाहत पोहत महिलेने आपला जीव वाचवला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शेतात शेंगा तोडता तोडता दुपारचे ४ वाजले. आभाळ भरुन आलेले. पावसाची चिन्हे होती. अशावेळी घरी जायला निघणार तोच अचानक एक कुत्रा माझ्याच दिशेने पळत येत होता. भांबावून त्याला बघतच होते तोच कुत्र्याची शिकार करण्याच्या इराद्यातील बिबट्याही पाठीमागे दिसला आणि काळजात धस्स झाले. बिबट्या दिसला.. बिबट्या आता आपली शिकार करेल या भितीने महिला पळत सुटली. पळता पळता नदीच्या किनाऱ्यावर जावून पोहचली. तिकडे भलामोठा पूर आलेली तापी नदी तर दुसरीकडे बिबट्या अशा कठीण परिस्थितीत महिला सापडली. मृत्यू डोळ्यासमोर उभा होता. मात्र ती हिंमत हरली नाही आणि खचूनही गेली नाही. बिबट्याच्या भितीने तिने पूर आलेल्या तापी नदीत उडी मारली. थोडं पोहता येत असल्याने काही अंतरावर पोहचली अन् हातात केळीचा वाहत येणारा खांब लागला. हाच केळीचा खांब या महिलेचा आधार ठरला. तब्बल १३ तास पाण्यात वाहत, पोहत महिला तब्बल ६० किलोमीटर अंतरावर जाऊन दुसऱ्या एका गावात नदीच्या काठावर पोहचली. तीही सुखरुप.. हे कुठल्या सिनेमाचं कथानक नाही, तर हा आहे .. एका महिलेसोबत खरोखर प्रत्यक्षात घडलेला थरार.

चोपडा तालुक्यातील कोळंबा येथील लताबाई दिलीप कोळी ( वय ५५) असे या रणरागिणीचं नाव असून तिने तिच्या शौर्याने अन् धाडसाने जीव घ्यायला आलेल्या यमदूताला माघारी पाठवले आहे.  लताबाई कोळी दोन मुलं, सुना, नातवंडांसोबत कोळंबा गावात राहते, वर्षभरापूर्वीच त्यांच्या पतीचं निधन झालंय. गावापासून काही अंतरावर तापी नदीकाठावर त्यांचे शेत आहे. यावरच त्यांचा उदरनिर्वाह भागतो. लताबाई कोळी या नेहमीप्रमाणे  एकट्याच त्यांच्या मालकीच्या शेतात चवळीच्या शेंगा तोडण्यासाठी गेल्या होत्या.

 इकडे आड तिकडे विहिर.. 

सायंकाळ होत असल्याने लताबाई कोळी शेतातून घराकडे निघणार तोच त्यांच्या बाजूच्या केळीच्या शेतातून कुत्रा धावत पळत आला. कुत्र्यावरुन नजर हटत नाही तोच या कुत्र्याच्या मागे बिबट्या दिसला. बिबट्याला पाहताच लताबाई ह्या भितीने पळत सुटल्या. मात्र पळाल्या त्या नदीकडे.. वरती टेकडीवर बिबट्या लताबाईंकडे पाहतोय. अन् लताबाई बिबट्याकडे. . धावत लताबाई नदीच्या काठावर पोहचल्या. ईकडे भला मोठा पूर आलेली तापी नदी तर दुसरीकडे टेकडीवर बिबट्या.. अजून काही वेळ घालवला तर बिबट्या आपली शिकार करेन या भितीने लताबाई यांनी पूर आलेल्या अथांग अशा तापीनदीत उडी घेतली.

थोड थोडं पोहता येत असल्याने लताबाई पाण्यात तरंगल्या. यातच काही अंतरावर त्यांच्या हातात वाहत येणारा केळीचा खांब लागला. या केळीच्या खांबाला पकडून त्या पोहत राहिल्या पूराच्या पाण्यासोबत वाहत राहिल्या. मात्र त्यांनी हिंमत खचू दिली नाही. रात्रभर हातात केळीचा खांब, दोन्ही हात पाण्यात मारत लताबाई पोहत राहिल्या. काही अंतरावर गेल्यावर अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाजवळ पोहचल्या. एका दरवाजातून तब्बल ३० ते ४० फूट उंच दरवाजातून जसा धबधबा कोसळतो, त्याप्रमाणे वाहत्या मात्र केळीचा खांब सोडला नाही.. त्यानंतर पहाटे साडेपाच वाचले. उजेड पडल्यावर लताबाई यांच्या जीव भांड्यात पडला. यात काही अंतरावर त्यांच्या पायाला वाळू लागायला लागल्यावर नदीचा काठ जवळच आहे, असे लक्षात आल्यावर त्या काठावर पोहचल्या.

 तब्बल १३ तास पूर आलेल्या विशाल तापी नदीत.. 

तब्बल १३ तास पाण्यात वाहत, असतांना अनुभव लताबाई सांगत पोहत असतांना अंगावर काटा उभा राहतो. यादरम्यान पाडळसरे धरणाजवळ पाण्यात विसर्जन केलेली एक मूर्ती डोक्यावर पडली, त्यामुळे दुखापत झाल्याचेही लताबाई सांगतात. सर्व देव आठवले. सर्व देवांची नाव घेतली, त्यामुळे तोंड सुध्दा दुखून आलं. पण हिंमत नाही हरले. आणि वाचले. माझा पुनर्जन्म झाला असून मी देवाचे.. त्या तापीमाईने मला मरु दिले नाही, त्या तापीमाईचे व ज्या केळीच्या खांबांचा आधार मिळालो, त्या केळी देवताचे मी खूप खूप आभार असल्याचे लताबाई सांगतात तेव्हा त्यांचे डोळे भरुन येतात. जीवंत असेपर्यंत केळीच्या खोडाची, तापीमाईची पूजा करीन असंही यावेळी लताबाई सांगतात.

इकडे मृत्यू काही पिच्छा सोडायला तयार नव्हता. काही तासांनंतर त्या प्रवाहात वाहत वाहत अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाजवळ आल्या आणि पुन्हा मृत्यू समोर येऊन ठाकला. धरणाच्या मितीवरून पाणी वाहत होते. पण त्या भितीवरुन खाली पडून नाका तोंडात पाणी जाऊ नये म्हणून लताबाईंनी एका हाताने केळीचा खांब घट्ट धरला आणि एका हाताने नाक तोड दाबले. पण अजून परिक्षा बाकी होती.

साडी फाटली म्हणून वाचली… 

धरणाच्या मध्ये त्यांची साडी अडकली मात्र नशीब बलवत्तर साडी फाटली. त्या पाण्याच्या प्रवाहात जोरात खाली पडल्या. श्वास रोखून धरल्याने खोल पाण्यातून पटकन वर आल्या आणि तापीमाईच्या कुशीत पुढचा अनिश्चित प्रवास सुरु राहिला. एव्हाना रात्र झाली. पण चंद्र प्रकाशात पुढे तिला तापीच्या डाव्या काठावर नाव लागलेल्या दिसल्या आणि जगण्याचे बळ अंगात काठाला लागण्याचा प्रयत्न सुरू केला.

 काठावर पोहोचताच उलट्या..

जेमतेम पोहत ती नावेजवळ काठावर पोहोचली अन् तिला उलट्या सुरु झाल्या. पोटातून पाणी बाहेर निघाले. ती गळीतगात्र झाली. कुणीतरी येईल या आशेने अर्धवट मुच्छित अवस्थेत तशीच पडून राहिली. दुसया दिवशी सकाळी आठ वाजता नावाडी आला आणि त्याने आवाज देऊन लताबाईची विचारपूस केली. अनेक १३ तास पाण्यात असल्याने त्वचा नरम झाली होती. थंडीने त्या कुडकुडत होत्या नावाड्याने गावात जाऊन खबर दिली. साडी रुमाल आणला, गावातील लोक आले. आणि मग तिला कळले की आपण अमळनेर तालुक्यात निम गावाला पोहोचलो आहोत. नाव गाव आणि घडलेली हकीगत सर्वांना सांगितली. सुदैवाने निमगावातच लताबाईंचा भाचा रहात होता. त्याने त्यांना ओळखले. दवाखान्यात प्रथमोपचार करून लताबाईंना घरी नेण्यात आले. त्या मृत्युंजयी ठरल्या आणि त्यांची ही थरारकथा पंचक्रोशीत मोठी आश्चर्याची आणि चर्चेचा विषय ठरली.

असा विक्रम करणाऱ्या लताबाई देशातील एकमेव महिला असाव्यात.

आतापर्यंत प्रसिध्द अशा जलतरण पटूंनी अनेक विक्रम केले असतील, मात्र सामान्य व गरीब कुटुंबातील महिला की जिने तब्बल १३ तास रात्रभर पूर आलेल्या विशाल अशा तापी नदीत पाण्यात पोहत वाहत जावून स्वत: चा जीव वाचविला. यात लताबाई हा विक्रम करणाऱ्या या देशातील एकमेव महिला असाव्यात यात शंका नाही. लताबाई कोळी यांच्याबाबतीत देव तारी त्याला कोण मारी. ही म्हण सार्थ ठरते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या