लासुर ता.चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
खान्देश व परिसरात वरुणराजाच्या आगमन झाल्याने शेतकरी बांधवांनी बियाणे, खते खरेदी अंतिम करण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. पेरणीला देखील वेग आला असून कापूस पिकासोबत मका पिकाचे क्षेत्रात वाढ होण्याचे संकेत बियाणे विक्री वरून दिसून येत आहे. यामुळे चोपडा तालुक्यातील कृषि निविष्ठा विक्रेत्यांची झाडाझडती कृषि विभागाने सुरूच ठेवली असून बियाणे, खते व कीटकनाशके यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविणेबाबत मोहीम हाती घेतली आहे.
रेकॉर्ड अपूर्ण असणाऱ्या, लिंकिंग करणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषि केंद्र चालकांना जागेवरच विक्री बंद आदेश देणे, सक्त ताकीद देणे यासारख्या कारवाया केल्या जात आहेत. यापुढे देखील ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे कृषि अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे. शेजारील राज्यातून बोगस खत, कीटकनाशके जळगाव जिल्ह्यात येऊ नये यासाठी चेक पोस्ट नाक्यावर देखील वाहनांची झडती घेतली जाणार आहे.
तालुका तसेच जिल्हा स्तरीय अधिकारी भरारी पथकाच्या माध्यमातून ही मोहीम या पुढेही सुरूच ठेवणार असल्याचे आणि गंभीर त्रुटी आढळून येणाऱ्या व सूचना देऊन देखील सुधारणा न करणाऱ्या कृषि निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित करणार असल्याची माहिती कृषि अधिकारी डी. एम. शिंपी यांनी दिली आहे.