जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
विधानपरिषदेत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी अनिल परब यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण बिघडले आहे. चित्रा वाघ यांच्यावर सध्या टीकेची झोड उठलीय. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला आहे.
“वडिलांना विचारा”
चित्र वाघ यांनी रोहिणी खडसेंच्या टीकेला उत्तर देताना “वडिलांना विचारा” असं म्हटलं होतं. रोहिणी खडसे यांनी ट्वीट करत म्हटलं की, माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी. ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय. याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं. तुम्ही ज्या पक्षाकडून विधान परिषदेच्या सदस्या झाला आहात त्या पक्षाला शून्यातून एका वटवृक्षात रुपांतर करण्यात, वाढवण्यात ज्या ठराविक लोकांची नावे घेतली जातात, त्यात माझ्या वडिलांचे नाव अग्रक्रमाने येते,” याची आठवण रोहिणी खडसे यांनी करुन दिली.
आकांडतांडव करून प्रसिद्धी
तसेच चार पक्ष फिरून येऊन तुम्ही आरामात ज्या पक्षाच्या विधानपरिषदेची जागा मिळवलीय ना आणि भाजपसारख्या भल्या मोठ्या वटवृक्षाच्या सावलीत आरामात बसलात ना, त्यात माझ्या वडिलांचे कष्ट आहेत. विचारा तुमच्या वरिष्ठांना… शेतकरी, दुर्लक्षित घटक, ओबीसी बांधव आणि शेवटच्या घटकांपर्यंतच्या माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करत ते इथवर आलेले आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रवास आजतागायत सुरूच आहे. यात कधी त्यांनी आकांडतांडव करून प्रसिद्धी मिळवली नाही. त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला… उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको”, असं रोहिण खडसे यांनी म्हटलं
प्रकरण काय ?
विधानपरिषदेतील शाब्दिक बाचाबाचीनंतर चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधताना रोहिणी खडसे यांनी त्यांची बिग बॉसमधील भांडणांशी तुलना केली होती. या ट्वीनंतर चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं की, “रोहिणी खडसे यांचे वडील विधानपरिषदेत माझ्या समोर बसतात. त्यांनी त्यांना विचारावं, ते जास्त चांगलं सांगतील.”