जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात सध्या यात्रा सुरु आहे. यावेळी किरकोळ भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांवर धारदार हत्याराने वार करून जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
चिंचोली गावातीलच सच्चिदानंद संजीवन पाटील (वय २८) हा तरुण त्याचा मित्र गणेश सुरेश मेढे यांच्यासोबत बुधवार १३ एप्रिल रोजी रात्री अडीच वाजता यात्रेत फिरण्यासाठी गेले. त्याठिकाणी किरकोळ भांडण सुरू झाले. यावेळी राजू गवळी रा. रायपूर कुसुंबा त्याच्यासह इतर अनोळखी दोन जण यांच्यात किरकोळ भांडण सुरू होते. ते भांडण सोडवण्यासाठी सच्चिदानंद पाटील आणि त्याचा मित्र गणेश मेढे हे गेले.
या गोष्टीचा राग आल्याने राजू कोळी आणि इतर दोन जणांनी तीक्ष्ण हत्याराने दोघांवर हातावर आणि दंडावर वार करून जखमी केले. यात दोन जण जखमी झाले. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी गुरुवार १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सच्चिदानंद पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी राजू कोळी यासह अनोळखी दोन जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफार तडवी करीत आहे.