बी. एन. पाटील
भातखंडे, लोकशाही न्यूज नेटवर्क
ग्रामीण भागात सध्या मुलांच्या विवाहाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून अनेक पालक चिंतेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण, नोकरी, स्थलांतर आणि बदलत्या सामाजिक अपेक्षा यामुळे मुलांची लग्ने उशिरा होत आहेत किंवा जुळतच नाहीत, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पूर्वी गावोगावी नातेसंबंधांमधून, ओळखीच्या माध्यमातून किंवा समाजातील मध्यस्थांद्वारे लग्ने सहज जुळत असत. मात्र आता मुलींचे उच्च शिक्षण, शहरांकडे वाढलेले आकर्षण, स्थिर नोकरीची अपेक्षा आणि आर्थिक निकष यामुळे जुळवाजुळव कठीण होत चालली आहे. परिणामी, अनेक सुशिक्षित व समंजस मुलांचे विवाह वर्षानुवर्षे रखडत आहेत. पालकांचे म्हणणे आहे की, “मुलगा शेतीशी जोडलेला असेल किंवा गावात राहत असेल तर मुलीकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. शहरात नोकरी, घर आणि आधुनिक सुविधा असाव्यात, अशी अपेक्षा वाढली आहे.” त्यामुळे ग्रामीण जीवनशैलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचे जाणवत आहे.
समाजातील जाणकारांच्या मते, विवाहसंस्थेबाबत बदलत्या विचारसरणीचा स्वीकार करताना ग्रामीण भागातील वास्तवही लक्षात घेतले पाहिजे. शेती, व्यवसाय किंवा स्थानिक रोजगार यांनाही सन्मान मिळाला, तर हा ताण कमी होऊ शकतो. तसेच विवाह जुळविताना अनाठायी अपेक्षा कमी करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, काही सामाजिक संस्था आणि मंडळे विवाह मेळावे, परिचय संमेलने आयोजित करून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र समाजाने एकत्रितपणे पुढाकार घेतल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, असेही मत व्यक्त होत आहे.

