लोकशाही न्यूज नेटवर्क

फडणवीस सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंदर्भात मोठं विधान केले. ‘जोपर्यंत राज्यात महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि महिलांना आर्थिक मदत मिळत राहील.’, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ई-केवायसीबाबत देखील महत्वाची माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मध्यमांशी संवाद साधताना लाडकी बहीण योजनेबाबत सांगितले की, लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी हा एक मोठा मुद्दा होता. ही योजना सुरू केल्यानंतर पहिल्या दोन ते चार महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात तपासणी करणे शक्य झाले नाही. त्यानंतर आम्ही अर्जांची तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान ज्यांनी नियमांचे उल्लंघन करून या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली. या लाभार्थी महिलांना वारंवार संधी देऊन देखील त्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नाही.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी असे देखील सांगितले की, ‘बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे लाखो महिलांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत.’ महत्वाचे म्हणजे, ज्या लाभार्थी महिलांच्या घरात इन्कम टॅक्स भरला जातो अशा लाखो अपात्र महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली आहेत. काही सरकारी कर्मचारी महिला आणि पुरूषांनी देखील चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्यावर सध्या सरकारकडून कायदेशीर कारवाई करत पैसे वसुल केले जात आहेत.
राज्यामधील १ कोटी ६५ लाख लाडक्या बहिणींनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. याच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांनाच सरकारकडून दरमहा १५०० रुपये दिले जातात. लाडक्या बहिणी आता जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे ३००० रुपये खात्यात कधी जमा होणार याची वाट पाहत आहेत. पण सरकारकडून हे पैसे कधीपर्यंत दिले जाणार आहेत, हे दोन्ही हफ्ते एकत्र दिले जाणार आहेत की वेगवेगळे याची अधिकृत माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, लाडकी बहीण योजनेत पात्र नसलेल्या तब्बल ९२ लाख लाभार्थ्यांना आतापर्यंत ९ लाख ६०० कोटी रुपये वितरित करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून उघड झाली आहे.


