…तर ‘लाडक्या बहिणीं’कडून दंडासहीत रक्कम वसूल होणार !

आमदार छगन भुजबळांचे विधान : नियमांना बगल देणे भोवणार

0

येवला, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील त्रुटी दूर करण्यासंदर्भात हलचालींना सुरुवात झाली आहे. या योजनेतील नियम डावलून लाभ मिळवलेल्या महिलांच्या खात्यातून रक्कम काढून घेतल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर आता माजी मंत्री आणि येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी सूचक विधान केले आहे. यापूर्वी झाले गेले ते विसरुन गेले पाहिजे. मात्र यानंतरही नियमांना बगल देऊन कोणी लाभ घेत असेल तर काय करता येईल यासंदर्भात भुजबळांनी येवल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले आहे.

येवल्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना भुजबळांना लाडकी बहीण योजनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळांनी, ‘आधी मला जे कळले होते तेव्हा नियम असा काहीतरी होता की, घरातील दोन महिलांना देताना त्यांची मोटरगाडी नसावी, दुचाकी नसावी, उत्पन्नासंदर्भात नियम होते. गरीब लोकांना देण्यात यावे असा उद्देश होता. पण लोकांनी सरसकट फॉर्म भरल्याने त्यांनी घेतला फायदा,’ असे म्हटले. पुढे बोलताना, ‘आता माझे म्हणणे असे आहे की, एक अपिल केले पाहिजे लोकांना. जे या नियमांमध्ये बसत नाहीत त्यांनी स्वत:हून आपली नावे काढा म्हणून सांगायला पाहिजे. जे पैसे दिले गेले ते परत मागण्यात काहीही अर्थ नाही. ते परत मागण्यात येऊ नयेत. या पुढे लोकांना सांगावे या नियमांमध्ये न बसणाऱ्यांनी स्वत: नावे काढून घ्यावीत. मात्र त्यानंतरही नावे नाही काढली तर मात्र त्यांच्याकडून दंडासहीत वसुली करण्यात येईल,’ असे भुजबळ म्हणाले. ‘मागचे जे झाले ते आपल्या लाडक्या बहिणींना अर्पण करुन टाकले पाहिजे,’ असेही भुजबळ यांनी म्हटले आहे.

 

माझी पतंग कोणी कापणार नाही

आता अनेकांच्या पतंगी तर कापल्या आहेत. आता आपल्या सहकाऱ्यांसोबत पतंग उडवू. माझी पतंग कोणी कापली नाही. मी येवला मतदारसंघाचा आमदार आहे आणि तोही पाचव्यांदा आहे. माझा जन्म येवल्यातील नाही, माझे कुटुंब येवल्यातील नाहीत. तरीही मतदारसंघातील जनतेने मला मागील 20 वर्षे आणि पुढील पाच वर्षे आमदारकी बहाल केली आहे. माझी पतंग कोणीही कापणार नाही, असेही भुजबळ यावेळेस म्हणाले.

 

माझ्यासाठी विषय संपला

मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या टीकेवरुन भुजबळांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भुजबळांनी, ‘माझ्यासाठी तो विषय संपला आहे. माझ्याविरुध्द कोणी काही बोलले नाही तर मी ही कोणाविषयी बोलणार नाही विषय संपला! सर्वांना शुभेच्छा,’ असे उत्तर दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.