विचारांची दिशा बदला…

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

विद्यार्थी हा त्याच्या जीवनात अनेक परीक्षांमधून जात असतो, मग ती शालेय असो अथवा महाविद्यालय. विद्यार्थी त्यांच्या जीवाचे रान करून अथक परिश्रम घेऊन अभ्यास करून प्रत्येक परीक्षेस सामोरे जात असतो. कधी-कधी तर असा प्रश्न पडायला लागतो की, विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठरवण्यासाठी परीक्षा हे एकच माध्यम आहे का ? परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी हा आतुरतेने निकालाची अन् चांगल्या मार्कांची अपेक्षा ठेवून वाट पाहत असतो. मग उत्तीर्ण झाल्यानंतर त्यास शुभेच्छांचा वर्षाव होतो तर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे साधे सांत्वन देखील केले जात नाही. मग कमी मार्क पडले, यादीत नाव आले नाही तर आत्महत्या हा एकच पर्याय शिल्लक राहतो का ? तर नाही..

यश आणि अपयश या जीवनरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. जीवन हे सुख तसेच दुःखाने देखील ओतप्रोत भरलेले आहे व यातून मार्ग काढणे गरजेचे असते. प्रत्येकास योग्य संधी प्राप्त होत असते व त्या संधीचे सोने होत नाही तोपर्यंत मेहनत, जिद्द, चिकाटी, धरून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतः मार्ग शोधला पाहिजे. त्या मार्गावर सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाने मार्गक्रमण करायला हवे. यातून नक्कीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी कोणीही थांबू शकत नाही.

विद्यार्थ्यांच्या मनात विचारांचा एक ओघ असतो. जिकडे वळण मिळते तिकडे तो वाहत जातो. मात्र त्या विचारांना योग्य स्थान आणि समज मिळणे आवश्यक असते. विद्यार्थ्यांच्या विचारांना दररोज एक दिशा अन् दशा प्राप्त होत असते. सतत वाचन, चिंतन, मनन, प्रेरणादायी व महात्म्यांचे आदर्श, चांगली जीवनशैली, सकारात्मक विचार, योग्य खानपान, योग्य वर्तन, नियोजन त्यासोबतच अध्यात्मिक विचार या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य वळण लागून विचारांची योग्य दिशा बदलून तो एक परिपूर्ण यशस्वी व्यक्ती आणि विद्यार्थी बनू शकतो. म्हणून विचारांची दिशा बदलणे आवश्यक आहे.

शब्दांकन
कविता ठाकरे – चौधरी
संपर्क- 9765136875

Leave A Reply

Your email address will not be published.