
मन की बात
मुक्ताईनगर येथील विश्रामगृहात बिबट्या शिरल्याची घटना निश्चितच गंभीर आणि धोकादायक होती. अशा प्रसंगी प्रशासन, विशेषतः वनविभाग, अत्यंत दक्षतेने आणि नियमबद्ध पद्धतीने काम करत असतो. वन्यप्राण्यांना पकडणे, त्यांना बेशुद्ध करणे आणि सुरक्षित ठिकाणी हलवणे ही एक तांत्रिक आणि संयमाची प्रक्रिया आहे. मात्र या सर्व प्रक्रियेदरम्यान लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी दाखवलेले वर्तन अनेक प्रश्न निर्माण करणारे ठरले आहे.
वनविभागाचे अधिकारी बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी त्याला दोन वेळा बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शनही दिले. ही प्रक्रिया वेळखाऊ असली तरी ती आवश्यक असते, कारण वन्यप्राणी आक्रमक होऊ शकतो आणि स्वतःलाही तसेच इतरांनाही धोका निर्माण करू शकतो. अशा वेळी संयम आणि शिस्त या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदारांनी हातात काठी घेऊन बिबट्याला मारहाण केल्याची घटना घडली. हे वर्तन केवळ असंवेदनशील नाही, तर कायद्याच्या आणि नैतिकतेच्या चौकटीबाहेर जाणारे आहे. वन्यजीव संरक्षणाचे स्पष्ट नियम आहेत. कोणत्याही वन्यप्राण्याशी अशा प्रकारे वागणे हे चुकीचे आहे, मग तो प्राणी कितीही धोकादायक का असेना. त्यासाठी प्रशिक्षित अधिकारी आणि तज्ज्ञ असतात, ज्यांना परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिलेले असते.
लोकप्रतिनिधींची भूमिका समाजासाठी आदर्श ठरावी अशी अपेक्षा असते. त्यांचे प्रत्येक कृत्य हे जनतेसाठी संदेश देणारे असते. जर लोकप्रतिनिधीच नियम तोडून, भावनेच्या भरात किंवा प्रसिद्धीच्या हव्यासापोटी असे वर्तन करत असतील, तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवायची? याशिवाय, अशा प्रकारचे वर्तन वनविभागाच्या कामात अडथळा निर्माण करणारे ठरते. बिबट्याला बेशुद्ध करण्याची प्रक्रिया सुरू असताना त्याला मारहाण केल्यास तो अधिक चिडचिडा होऊ शकतो, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनू शकली असती. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना धक्का बसण्याची शक्यता अधिक होती.
या घटनेत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्टंटबाजीचा. सध्याच्या काळात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेकजण धोकादायक आणि गैरजबाबदार कृती करताना दिसतात. दुर्दैवाने, हीच प्रवृत्ती काही लोकप्रतिनिधींमध्येही दिसून येत आहे. लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेली ही कृती उलट त्यांच्याच प्रतिमेला धक्का देणारी ठरते. वन्यजीव हे आपल्या पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहेत. बिबट्यासारखा प्राणी जंगलातून बाहेर येतो, तेव्हा तो बहुतेक वेळा घाबरलेला किंवा दिशाहीन झालेला असतो. अशा वेळी त्याच्याशी सहानुभूतीने आणि शास्त्रीय पद्धतीने वागणे आवश्यक असते. त्याला मारहाण करणे किंवा छळ करणे हे केवळ अमानवीय नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीनेही चुकीचे आहे.
या घटनेनंतर संबंधित आमदारांवर कारवाई व्हावी का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. कायदा सर्वांसाठी समान असावा, मग तो सामान्य नागरिक असो किंवा लोकप्रतिनिधी. जर एखाद्या सामान्य नागरिकाने असे कृत्य केले असते, तर त्याच्यावर निश्चितच कारवाई झाली असती. त्यामुळे या प्रकरणातही निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे. चंदूभाऊ हे वागणे बरे नव्हे! लोकप्रतिनिधींनी आपल्या वर्तनातून आदर्श निर्माण करावा, हीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

दीपक कुलकर्णी
वरिष्ठ उपसंपादक
मो. 9960210311

