चंद्रयान-3 साठी हातेडच्या सुपुत्राची महत्त्वपूर्ण भूमिका

0

हातेड येथील संजय देसर्डा शास्त्रज्ञाची द्रवरुप इंधनासाठी कामगिरी

जळगाव;- भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चंद्रयान मोहिमेअंतर्गत 14 जुलैला दुपारी 2.35 वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून चंद्रयान-3 चं यशस्वी प्रक्षेपण केले. एलव्हीएम-3 लाँचरचा वापर करण्यात आलेला आहे. जर लँडर सॉफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरला तर भारत हा दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरेल. या मोहिमेमध्ये कान्हदेशातील जळगाव जिल्ह्यातील हातेड या छोट्याशा गावातून इस्रो पर्यंत पोहचणारे संजय गुलाब देसर्डा यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका ठरलेली आहे. जैन फार्म फ्रेश फुडस् च्या करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा, प्लास्टिक पार्क येथील कस्टम विभागाचे वरिष्ठ अधिकारी डोंगरमल देसर्डा आणि जैन फूडपार्क येथे कार्यरत छगनमल देसर्डा यांचे ते पुतणे असून या त्यांच्या सहभागाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व कंपनीच्या विस्तारीत कुटुंबातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

615 कोटी रुपये खर्चून तयार केलेले हे मिशन सुमारे 50 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणार आहे. या मोहिमेत चंद्रयानचा एक रोव्हर (छोटा रोबोट) बाहेर येईल जो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर त्याचं स्थान निश्चित केले जाईल. इथेच रोव्हर चंद्राच्या या भागात कोणते खनिजे आहेत, पाणी आहे का, इत्यादीचा शोध घेईल असे संजय देसर्डा यांनी सांगितले.

मूळ हातेड येथील राहणारे व चोपडा येथील वर्धमान जैन श्री संघाचे संघपती गुलाबचंद इंदरचंद देसर्डा यांचे सुपुत्र संजय हे गेल्या २० वर्षांपासून इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून चंद्रयान-3 यशस्वी प्रक्षेपण झाले. या यानासाठी त्यांनी द्रवरुप इंधनावर काम केले. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या मोहिमेसाठी कार्यरत होते. अवकाशात सोडल्या जाणाऱ्या तीन प्रकारचे यानांसाठी इंधन हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. यानाचे पीएसएलव्ही, जीएसएलव्ही आणि काल प्रक्षेपीत झालेल्या यानात एलव्हीएम ३ मध्ये द्रव (लिक्विड) इंधन लागत असते. यात वरीष्ठ शास्त्र म्हणून इस्त्रोकडून जबाबदारी त्यांना देण्यात आलेली होती. यापूर्वी संजय देसर्डा यांनी मंगळयान, चंद्रयान – २, चंद्रयान -३ या व्यतिरिक्त अनेक मोहिमेत महत्त्वपूर्ण जबाबदारी निभावलेली आहे. चंद्रयान मोहिमेसाठी हातेडच्या सुपुत्राचे परिश्रम व बुद्धीची कामगिरीसाठी मोलाची भूमिका पार पाडता आली याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतवासियासाठी आहे. संजय देसर्डा यांच्या या विशेष कार्याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हातेड ते इस्त्रो खडतर प्रवास…

संधी प्रत्येकाला मिळत असते परंतु संधीचे सोन्यात रुपांतर करणे फार कमी लोकांना जमते. संजय गुलाबचंद देसर्डा यांचा जन्म हातेडच्या देसर्डा परिवारात झाला. शालेय शिक्षण हातेडच्या सरकारी शाळेत झाले नंतर त्यांना अभियांत्रिकीमध्ये अधिक रस असल्याने फैजपूरच्या जे.टी. महाजन इंजिनियरिंग कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा व लाभलेली प्रगल्भ बुद्धीमत्ता आणि देसर्डा परिवाराने दिलेल्या प्रोत्सहनामुळे ते गेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयआयटी वाराणसी म्हणजे बनारस हिंदु युनिर्व्हसिटी येथून एमटेक पद्युत्तर शिक्षण घेत असताना २००३ मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू साठी इस्त्रोचे कमिटी आली व त्यात संजय यांची निवड झाली. ऑगस्ट २००३ मध्ये नियुक्ती झालेल्या संजय देसर्डा यांनी इस्त्रोकडून विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या त्या यशस्वी पार पाडल्या आहेत. जसे भारतातील इस्त्रो आहे तसेच पॅरिस येथील ‘केनेस’ नावाची रॉकेटमध्ये काम करणारी संस्था आहे त्यासाठी आठ दिवसांच्या प्रशिक्षणासाठी त्यांची निवड झालेली होती. याशिवाय ‘टीम एक्सलन्स’ पुरस्काराने देखील त्यांचा गौरव झालेला आहे. हातेड ते इस्त्रो हा प्रवास आपल्यासाठी अनुभवांनी भरलेला होता असे संजय म्हणतात. संजय यांच्या परिवारात त्यांची पत्नी सौ. चित्रा या गृहिणी आहेत, मोठी कन्या ऊर्जा आणि लहान मुलगा आयुष हा बारावीमध्ये असून तो देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून शास्त्रज्ञ म्हणून आपले करियर करणार अशी त्याची इच्छा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.