मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आमचे विरोधक एकनाथ शिंदे हे नाराज आहेत असे म्हणत होते. पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे नेते म्हणून अत्यंत स्पष्टपणे विरोधकांना आणि महाराष्ट्रातील जनतेला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे निर्णय घेतील तो निणर्य मान्य असेल अशी त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांचे आभार, असे पत्रकार परिषदेमध्ये चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. तसेच सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाचे केंद्रीय नेतृत्व एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेल, असेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम केले आहे. महायुतीचा चेहरा म्हणून त्यांनी राज्यात अनेक योजना राबवल्या. तसेच फडणवीसांच्या खांद्याला खांदा लावून सरकार चालवले. आज त्यांनी जी भूमिका घेतली आहे. मी त्याचे स्वागत करतो. त्यांची भूमिका राज्याला पुढे नेण्याची भूमिका आहे. तसेच त्यांचा निर्णय महायुतीला भक्कम करणारा आहे, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
आमची लढाई मुख्यमंत्री पदासाठी नाही तर आमची लढाई राज्यातील 14 कोटी जनतेसाठी होती. त्यामुळे जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले. पण महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदासाठी लढाई करत होती. त्याच्यात 8 मुख्यमंत्री होते. काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडे प्रत्येकी 3 आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे दोन मुख्यमंत्री होते, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. तर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला धोका दिला होता, अशी टीका देखील त्यांनी केली.