चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज होळी उद्या धुलीवंदन हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतांना मोठ्या प्रमाणात रंगाची उधळण केली जाते. तसेच ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. या कालावधीत काही अतिउत्साही तरूण मंडळी मद्य प्राशन करून दुचाकी, चारचाकी वाहने भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवितात. तसेच रोडने रॅश ड्रायव्हिग, स्टंटबाजी सारखे कृत्य करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडून जिवितहानी होत असते.

अशा प्रकारच्या कृत्यावर आळा घालण्याच्या दृष्टीने दिनांक १३ मार्च २०२५ ते दि. १४ मार्च २०२५ या कालावधीत संपुर्ण चंद्रपुर जिल्ह्यामध्ये ठिक ठिकाणी नाकेबंदी लावण्यात येणार आहे. जिल्हातील नागरीक मद्य प्राशन करून वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. जिल्ह्यातील वाढते अपघात कमी करण्याकरीता वाहतुक नियंत्रण शाखा चंद्रपुर व जिल्ह्य़ातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरोधात मोठ्या प्रमाणात ड्रंक अॅण्ड ड्राइव्हची विशेष मोहीम घेवुन कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
तरी होळी व धुलीवंदन साजरा करतांना वाहन धारकांच्या चुकीमुळे निष्पाप नागरीकांचा बळी जावुन होळीच्या रंगाचा बेरंग होवु नये याकरीता वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन चंद्रपुर पोलीस विभागातर्फे करण्यात आले असल्याचे एका प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहेत.


