दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – रिपाइंची मागणी

अमृतसरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना चंद्रपूरातही केला निषेध

0

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी, अशी मागणी रिपाइं (आठवले) जिल्हा शाखेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना मार्फत राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले.

पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा रिपाइं पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला.

या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. हा प्रकार संतापजनक असून सामाजिक अशांतता निर्माण करण्यासाठी काही समाज विघातक वृत्तीच्या इसमांनी ही घटना घडवून आणली आहे.

या घटनेला पंजाबचे सरकार जबाबदार आहेत. संबंधित आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन सादर करते वेळी रिपाईचे जिल्हाप्रमुख गौतम तोडेजिल्हा, विदर्भ प्रदेश महासचिव अशोक घोटेकर, चंद्रपूर तालुका अध्यक्ष हंसराज मेश्राम, महिला आघाडी शहर अध्यक्ष अश्विनी रायपुरे, जिल्हा महीला आघाडी किरण गेडाम, चंद्रपूर शहर महासचिव संदिप जंगम, जिल्हा आयटी सेल अध्यक्ष नागसेन डांगे, जिल्हा सदस्य रिपाई ॲड. किशोर कराडे, रिपाई कार्यकर्ता चंदु राऊत, रिपाई कार्यकर्ता राहुल मून आदिंची उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.