शिक्षक पगार अपहार प्रकरणी मुख्य आरोपीला २१ पर्यंत कोठडी

इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोध मोहीम

0

शिक्षक पगार अपहार प्रकरणी मुख्य आरोपीला २१ पर्यंत कोठडी

इतर आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांकडून शोध मोहीम

चाळीसगाव प्रतिनिधी ;- जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चाळीसगाव येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारातील अंदाजे ९७.०१ लाख रुपयांच्या अनुदान अपहार प्रकरणी मुख्य आरोपी अशोक खलाणे याला पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे सचिव अशोक खलाणे, मुख्याध्यापक अभिजीत खलाणे आणि क्लर्क ज्ञानेश्वर महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००६ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत, संगनमताने काही शिक्षकांना धमकावून संमतीपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्याचा आरोप आहे. तसेच, काही शिक्षकांच्या पगारातून अनुदान कपात करून मोठा आर्थिक अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस हवालदार विनोद पाटील आणि भूपेश वंजारी यांच्या पथकाने मुख्य आरोपी अशोक खलाणे याला अटक केली.

१५ मार्च रोजी आरोपीला चाळीसगाव न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे सरकारी वकिलांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने आरोपीस २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. इतर आरोपींच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरू असून, लवकरच पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक कबाडी यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.