गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

0

गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्या

चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी ;– शहरात गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली असून, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री २:२० वाजता एका तरुणाकडून बनावटी गावठी पिस्टल जप्त करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

चाळीसगाव शहर पूर्वी शांतताप्रिय म्हणून ओळखले जायचे, पण मागील काही वर्षांत गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोंबी ऑपरेशन आणि संवेदनशील भागात गस्त वाढवण्यात आले आहेत. समाजविरोधी घटना रोखण्यासाठी ही कारवाई केली जात आहे.

पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना गुप्त बातमी मिळाली की, छाजेड ऑइल मिलच्या मागे घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरी मार्गावर एक व्यक्ती गावठी कट्ट्यासह येणार आहे. यानुसार, उपनिरीक्षक गणेश सायकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने – ज्यात पोहेकॉ समीर पाटील, निलेश पाटील, रवींद्र बच्छे, राकेश महाजन, केतन सुर्यवंशी, नरेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर पाटोळे, कल्पेश पगारे, विलास पवार आणि गोपाल पाटील यांचा समावेश होता – सदर ठिकाणी नाकाबंदी केली.

रस्त्यावरून येत असलेल्या संशयित व्यक्तीला घेराव घालून पंचांच्या उपस्थितीत चौकशी केली. त्याने आपले नाव मयूर राजू मोरे (रा. प्रभात गल्ली, चाळीसगाव) सांगितले. अंगझडतीत त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूला शर्टाच्या आत ३२,००० रुपये किंमतीचा बनावटी गावठी पिस्टल (मॅगझीनसह) आणि २ राउंड जप्त करण्यात आले. जागीच पंचनामा करून वस्तू जप्त केल्या.

या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४३९/२०२५ दाखल करण्यात आला आहे. हत्यार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कलम ३/२५ आणि महाराष्ट्र पोलिस कायद्यांतर्गत कलम ३७(१)(३) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.