पोलिसाने मागितली ३ लाखांची खंडणी

पॉस्कोच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, चुकीला माफी नाही - आ. मंगेश चव्हाण

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाचखोरीच्या घटना घडत आहे. त्यातच जर कायद्याचे रक्षकच भक्षक बनले तर कायद्याचे तीन तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही. चाळीसगाव शहरातील एका कॉम्प्युटर क्लास चालकाला 3 लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्कोच्या गुन्ह्यात अडकवू अशी धमकी देत त्यांच्याकडुन 1 लाख 20 हजार रुपये खंडणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या काही कर्मचार्‍यांनी घेतल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण  यांना मिळाली.

तात्काळ संबंधित तक्रारदार यांच्यासह शहर पोलीस स्टेशन गाठून 4 तास ठिय्या दिला असता खंडणी उकळणारे संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सदर पोलीस कर्मचारी याच्या घराच्या झडतीत त्याने खंडणी घेतलेले 1 लाख 20 हजार रुपये देखील हस्तगत करण्यात आले अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली.

याची तात्काळ दखल घेत जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियंत्रण कक्षात तात्काळ बदली केली आणि त्या कर्मचाऱ्याचे निलंबन केले आहे.

ज्या पोलिसांनी नागरिकांना अपप्रवृत्ती पासून संरक्षण दिले पाहिजे तेच कायद्याचे रक्षक जर भक्षक होऊन सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरत खंडणी उकळत असतील तर ते कदापिही सहन केले जाणार नाही. या प्रकरणाच्या बाबतीत मी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तक्रार करणार असून यात सहभागी सर्व पोलिसांची आयपीएस दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याची मागणी करणार आहे.

शासन प्रशासनातील कुणीही आपल्याला त्रास देत असेल, कुठेही पैश्यांची मागणी होत असेल, अडवणूक होत असेल, पोलिसांकडून न्याय मिळत नसेल तर आपण विनासंकोच माझ्याशी कधीही संपर्क साधा. मंगेश चव्हाण अशा नागरिकांच्या पाठीशी कायम उभा राहील असे आमदार चव्हाण यांनी सांगितले.  चाळीसगावात सर्वसामान्य लोकांना वेठीस धरण्याचा प्रकार मुळीच खपवून घेतला जाणार नाही. चुकीच्या प्रवृत्तीला कोणी कितीही मोठा असू द्या, चुकीला माफी नाही.असेही ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.