धक्कादायक; आई वडिलांना देवदर्शनासाठी बसवले; मात्र त्याच रेल्वेखाली गेला मुलाचा जीव…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जिल्ह्यातील चाळीसगावातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या आईवडिलांना देवदर्शनासाठी रेल्वे स्थानकावर सोडायला गेलेला मुलगा त्यांना रेल्वेत बसवून खाली उतरतांना पाय घसरून त्याच गाडी खाली येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. योगेश गंभीरराव पाटील असे मयताचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे या गावातील योगेश पाटील हे मूळचे रहिवासी आहेत. ते आई वडिलांसह चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विवेकानंद कॉलनीत वास्तव्यास होते. आपल्या वृद्ध आई वडिलांना हरिद्वारची यात्रा घडावी, यासाठी योगेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रवासाचे नियोजन केले दरम्यान दादर अमृतसर या रेल्वे गाडीचे आरक्षण मिळाले होते. त्यानुसार पहाटे योगेश पाटील हे त्यांच्या आई वडिलांना सोडण्यासाठी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गेले. याठिकाणी योगेश पाटील यांनी आई वडिलांना बसविले. आई वडिलांशी बोलत असतानाच रेल्वे सुरू झाली. काही वेळातच गाडीचा वेग वाढला. यादरम्यान योगेश पाटील हे घाईत रेल्वे गाडीतून उतरताना त्यांचा तोल गेला व खाली पडून ते रेल्वे गाडीत ओढले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान चाळीसगाव रेल्वे स्थानकावरुन गाडी निघून गेली होती. मुलगा योगेश पाटील यांचा मृत्यू झाल्याची घटना नातेवाईकांनी फोनवरुन रेल्वेत बसलेल्या योगेश पाटील यांच्या वडिलांना कळविली. त्यानुसार पाचोरा रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबल्यानंतर योगेश पाटील यांचे आई वडील गाडीतून उतरून खाजगी वाहनाने चाळीसगावकडे परतले. काही तासांपूर्वी ज्या मुलाने आपल्याला यात्रेसाठी रेल्वेत बसवले, त्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने आई वडिलांनी मन हेलावणारा आक्रोश केला.

चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून योगेश पाटील हे कार्यरत होते. मयत योगेश पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. योगेश पाटील हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धर्मा रामा वाघ यांचे जावई होते. घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांच्या शाळेतील सहकारी शिक्षकांनीही रुग्णालयात गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.