पोस्ट एजंटच्या बॅगेतून ५० हजारांची रोकड लंपास
स्टेशन रोड परिसरात भरदिवसा चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव प्रतिनिधि चाळीसगाव पोस्ट कार्यालयातून ग्राहकासाठी काढलेली ५० हजार रुपयांची रोकड पोस्ट एजंटच्या बॅगेतून अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्ट कार्यालयाचे एजंट पुरुषोत्तम श्रीधर वाणी (वय ७४) यांनी त्यांच्या नावाच्या चेकद्वारे ग्राहकाची ५० हजार रुपयांची रक्कम पोस्ट कार्यालयातून काढली होती. ही रक्कम बॅगेत ठेवून ते दुचाकीवरून स्टेशन रोड परिसरातील संबंधित ग्राहकाकडे देण्यासाठी जात असताना ही चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. ग्राहकाकडे पोहोचल्यानंतर बॅग उघडून पाहिली असता त्यामधील रोकड गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील तपासणीदरम्यान बॅगेला तीक्ष्ण हत्याराने कट मारण्यात आल्याचे आढळून आले.
अज्ञात भामट्याने गर्दीचा फायदा घेत बॅग कापून रोकड चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वाणी यांनी शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे.

