बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार !
वाघडू शिवारातील घटना ,; परिसरात भीतीचे वातावरण

चाळीसगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क
तालुक्यातील वाघडू गावाजवळील शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने झडप घालत ठार मारल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे वाघडू परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून पुन्हा एकदा बिबट्याच्या धुमाकुळाची चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघडू येथील दिलीप झिपरू पाटील यांच्या गावालगतच्या शेतात नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी गाय बांधलेली होती. सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना गाय मृतावस्थेत दिसली. गायीचे पोट फाडलेले असून घटनास्थळी बिबट्याचे पावलांचे ठसेही आढळले. त्यामुळे गायीवर बिबट्यानेच हल्ला केल्याचे स्पष्ट झाले.
यापूर्वी काही महिन्यांपूर्वी रांजणगाव शिवारातही बिबट्याने हैदोस घातला होता. त्या वेळी वनविभागाने पिंजऱ्यात पकडून बिबट्याला जेरबंद केले होते. त्यानंतर परिसरात उपद्रव थांबल्याचे वाटत असतानाच पुन्हा या घटनेमुळे नागरिक धास्तावले आहेत.
या हल्ल्यात शेतकरी पाटील यांचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली असून विभागाने घटनास्थळ परिसरात पिंजरे लावून बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना सुरू करण्याचे सांगितले आहे.


