चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
चाळीसगावमधून एक मोठी बातमी समोर आलीय. आज सायंकाळी अचानक दोन वेळा चाळीसगाव मोठ्या आवाजाने हादरलं. या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. अनेकांनी हा भूकंप असल्याचा अंदाज लावून प्रशासनाला माहिती दिली. मात्र, जिल्हा प्रशासनाने भूकंपाची कोणताही नोंद नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यात सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास हा आवाज शहरासह ग्रामीण भागात ऐकू आला. काही सेकंदाच्या अंतराने दुसऱ्यांदा तोच आवाज पुन्हा ऐकू आला आणि त्यासोबत हलकासा भूचालसदृश कंपनही जाणवले. यामुळे नागरिकांनी घाबरून तात्काळ घराबाहेर धाव घेतली. काहींनी हा आवाज मोठ्या स्फोटासारखा असल्याचं सांगितले. तर काहींनी तो आकाशात घडलेल्या घटनेशी संबंधित असावा, असा अंदाज व्यक्त केला.
चाळीसगाव तालुक्यात या गूढ आवाजाबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्यानं नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. अचानक मोठा आवाज झाला आणि काही सेकंदांसाठी जमिनीला कंपन जाणवलं. आम्ही लगेच घराबाहेर पडलो. यामुळे चर्चेला उधाण आलाय. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.