चाळीसगावात कीर्तनवाद पेटला; पोलीस निरीक्षकाची जाहीर माफी

1

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

काल चाळीसगाव शहरातील हनुमान नगर येथे सप्तशृंगी माता मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने कीर्तनकार श्री सोमनाथ महाराज जपे यांचे कीर्तन सुरू होते, यादरम्यान चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी रात्री दहा वाजेच्या सुमारास एकम स्टेजवर, आपल्या बुटासह येवून नारदाच्या गादी वर उभे राहून महाराजांच्या हातातून माईक हिसकावून घेतला, वारकरी संप्रदायाचा विचार न करता, तेथे ठेवलेले पवित्र ग्रंथ भगवद्गीतेचा विचार न करता, किर्तन ऐकणाऱ्या जनतेचा विचार न करता, तसेच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पवित्र गाथेचा व नारदाच्या गादीवर सरळ बूट घालून अवमान केला.

हेही वाचा –

कीर्तन वाद वाढवला जातोय कशासाठी ?

या घटनेबाबत ह.भ.प श्री गुरुवर्य मोतीराम महाराज वारकरी बहुउद्देशीय संस्था चाळीसगाव यांच्यामार्फत चाळीसगाव येथील रेस्ट हाऊसमध्ये संध्याकाळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव यांना देण्यात येणाऱ्या निवेदनात म्हटले की, कीर्तनाची वेळ दहा वाजेपर्यंत होती आणि बऱ्याचदा कोणताही समारंभ असो तो वेळेच्या दहा मिनिटं तरी अधिक सुरू असतो मात्र सदरहू कार्यक्रम कोणत्याही लग्नकार्य किंवा मैफिलीचा नव्हता सदर कार्यक्रम हा संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शिकवलेल्या पवित्र कीर्तनाचा अभंगाचा होता.

तसेच आम्ही देखील महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमांचे पालन करूनच सदरहू कीर्तन सुरू होते. केवळ दहा मिनिटे उशीर झाला म्हणून चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री के के पाटील यांनी अक्षरशः आपल्या पदाला शोभणार नाही असे कृत्य करून नारदाच्या गादीवर बूट घालून येऊन वारकरी संप्रदायाचा अवमान केला आहे. तसेच एकेरी भाषेत मृदंगाचार्य राम महाराज यांना म्हणाले की, आत्ता यापुढे वाजवताना दिसला मार खाशील ? अशा भाषेत बोलून निघून गेले. तसेच के के पाटील यांनी केलेल्या कृत्याचा आम्ही निषेध करतो आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे संतांच्या या भूमीतील वारकरी संप्रदाय दुखावला गेलेला असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या महाविकास आघाडीचे सरकार असल्याने अशा अधिकाऱ्यांना सत्तेचा माज चढला आहे आणि अशा दुष्ट प्रवृत्तींना पालक मंत्र्यांची साथ आहे का ? असाही सवाल उपस्थित केला?

जळकेकरांचा के के पाटील यांना निलबंनासाठी पाच मे चा अल्टिमेट

या अवमान केल्याप्रकरणी श्री के के पाटील यांना पाच मेपर्यंत निलंबित करण्यात यावे असे जर झाले नाही, तर जळगाव जिल्ह्यातील सर्व वारकरी संप्रदाय जिल्हाभर ठिय्या आंदोलन करतील असेही सांगितले. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की आमदार श्री मंगेश चव्हाण यांच्या कार्यालयात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी रात्री किर्तनात ज्या भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील त्यांची दिलगिरी व माफी मागितली आहे याबाबत आपले मत काय? यावर जवळेकर म्हणाले की, आमदार चव्हाण साहेब यांच्या कार्यालयावरील कार्यक्रम हा भाजपा अध्यात्मिक आघाडीचा कार्यक्रम होता वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम नव्हता, त्यामुळे के के पाटील यांनी तिथे मागितलेली माफी ही आम्हास मान्य नाही, माफी ही वारकरी संप्रदायासमोरच मागितली गेली पाहिजे होती. यावेळी हभप कृष्णा महाराज चाळीसगावकर हभप दत्तात्रय महाराज पातोंडेकर, मृदुंगाचार्य राम महाराज उपस्थित होते.

पोलीस निरीक्षकांनी मागितली वारकरी संप्रदायाची जाहीर माफी

सदर फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले असता राज्यभरातील वारकारी संप्रदाय व हिंदू जनमानसात तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. काल मध्यरात्री याबाबत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनादेखील ही बातमी कळली असता तसेच चाळीसगाव तालुक्यातील वारकरी संप्रदायातील मान्यवर व विविध हिंदुत्ववादी संघटनांचे याबाबत फोन आले असता त्यांनी तत्काळ पोलीस निरीक्षक के के पाटील यांना सदर विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले व याचे उद्या राज्यभरात पडसाद उमटून कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल याची कल्पना दिली. त्यावेळी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी देखील सदर घटना अनवधानाने झाली असून मला पवित्र अश्या नारदाच्या गादीचे महत्व माहिती नव्हते असे सांगितले, कर्तव्य बजावत असताना हि चूक झाली असल्याने मी सर्व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागण्यास तयार असल्याचे सांगितले.

याबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मान्यवर व पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांची बैठक आपल्या अंत्योदय जनसेवा कार्यालयात घडवून आणली. त्यावेळी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांनी विठ्ठलाच्या प्रतिमेला साक्षी ठेवून अनवधानाने घडलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागत असल्याचे सांगितले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले की, मी स्वतः वारकरी पुत्र असल्याने माझ्याही भावना दुखावणे साहजिकच होते मात्र तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांचे काम, त्यांनी शहरातील अवैध धंधे, मुलींची छेड गाडणारे गावगुंड यांचा केलेला बंदोबस्त व आजवरची त्यांची कामगिरी माझ्यासह चाळीसगाव शहराने अनुभवली असल्याने या सर्व विषयावर पडदा पडावा, तसेच सर्व समाजाला सदर घटनेतील पोलीस प्रशासनाची बाजू कळावी या उद्देशाने चाळीसगाव शहरातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व मान्यवर मंडळी सोबत त्यांची बैठक आज चाळीसगाव येथील कार्यालयात घडवून आणली असल्याचे सांगितले पुन्हा अश्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्याच्या सूचना देखील पोलीस प्रशासनाला केल्या.

गेली दोन वर्ष कोविड मुळे कीर्तन बंद होते, चाळीसगाव तालुक्यात आता कुठे काही प्रमाणात कीर्तन सप्ताह सुरु झाले असून त्यासाठी पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांची वेळोवेळी मदत झाली असल्याचे उपस्थित कीर्तनकार व मान्यवर यांनीदेखील मान्य केले. व के.के.पाटील यांच्याकडून ही चूक अनवधानाने झालेली असल्याचे त्यांनी मान्य केल्याने व वारकरी संप्रदायाची जाहीर माफी मागितली आहे. वारकरी संप्रदाय हा सहनशील असून आपण आजवर अनेकांच्या चुका पोटात घेतल्या आहेत.

एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडून ही चूक झाल्याने तसेच चाळीसगाव शहरातील त्यांचे आजवरचे चांगले काम पाहता हा विषय आम्ही इथेच थांबवीत असल्याचे जाहीर केले तसेच आता यापुढे सोशल मिडीयावर कुठल्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देऊ नये असेदेखील आवाहन केले.

यावेळी ह.भ.प. राम महाराज, ह.भ.प. सुधाकर तात्या, ह.भ.प. ए.बी.पाटील, ह.भ.प. ओझर लीलाधर महाराज, ह.भ.प. राम महाराज, पातोंडा येथील ह.भ.प. अल्केश महाराज, ह.भ.प. विनय महाराज हिरापूर, ह.भ.प. मयूर महाराज, ह.भ.प. रोहिदास महाराज, ह.भ.प. उदय महाराज, ह.भ.प. विनीत महाराज, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा. सुनील निकम, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा अध्यात्मिक आघाडी जिल्हा समन्वयक भूषण पाटील, भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुरेश महाराज आदी उपस्थित होते.

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    ठिक आहे . झाले गेले ते विसरून आता जास्त विषय वाढवू नका कोणतेही राजकारण करू नका . उठ उठ मविआवर टिका करण्याची संधी साधू नका .

Leave A Reply

Your email address will not be published.