बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह गिरणा नदीपात्रात सापडला
चाळीसगाव प्रतिनिधी :
तालुक्यातील वरखेडे खुर्द येथील शेतकरी अण्णा शंकर तिरमली (वय ५८) हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होते. रविवारी (दि. १९ ऑक्टोबर) सकाळी त्यांचा मृतदेह तिरपोळे गावाजवळील गिरणा नदीपात्रात आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा तिरमली हे १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गिरणा नदीकाठावर असलेल्या आपल्या शेतातील विहिरीवर वीज पंप सुरू करण्यासाठी गेले होते. मात्र, ते त्यानंतर घरी परतले नाहीत. बराच वेळ उलटूनही ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु ते कोठेच सापडले नाहीत. अखेर दुसऱ्या दिवशी त्यांच्या बेपत्त्याची नोंद चाळीसगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.
चार दिवसांच्या शोधानंतर अखेर रविवारी सकाळी नऊच्या सुमारास तिरपोळे परिसरातील गिरणा नदीपात्रात अण्णा तिरमली यांचा मृतदेह तरंगताना दिसला. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
प्राथमिक अंदाजानुसार, अण्णा तिरमली यांचा पाय घसरून ते नदीपात्रात पडले असावेत, असा पोलिसांचा निष्कर्ष असून या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे वरखेडे खुर्द परिसरात शोककळा पसरली आहे.