दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणावर चाकूहल्ला; वाघनगरात खळबळ
जळगाव (प्रतिनिधी) : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून तरुणावर धारदार चाकूने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना वाघनगरातील शंभरफुटी रस्त्यावर घडली. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
रोहीदास संजय लोखंडे (वय २३, रा. वाघनगर) हे रिक्षा चालक असून दि. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ते शंभरफुटी रोड परिसरातून घरी जात होते. त्यावेळी संशयित विक्की कोळी (वय २४, रा. समता नगर, धामणगाव वाडा) याने त्यांना अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले. लोखंडे यांनी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिल्याने संशयिताचा संताप अनावर झाला. त्याने प्रथम कानशिलात मारहाण केली आणि त्यानंतर जवळील धारदार चाकूने रोहीदास लोखंडे यांच्या बरगड्या व पोटावर तीन वेळा वार करून गंभीर जखमी केले.
हल्ल्यानंतर संशयित विक्की कोळी घटनास्थळावरून पसार झाला. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या रोहीदास लोखंडे यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर लोखंडे यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून संशयित विक्की कोळी याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी करीत आहेत.