घरमालकावर भाडेकरूचा चाकू हल्ला; खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
जळगाव, नशिराबाद: – घर खाली करण्याच्या वादातून भाडेकरूने घरमालकाच्या पोटात चाकू खुपसून गंभीर जखमी केले. ही घटना १४ मार्च रोजी नशिराबाद येथे घडली. या प्रकरणी भाडेकरू प्रमोद नामदेव पाटील (वय ४५, रा. नशिराबाद) याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गलू पुजो पाटील यांनी त्यांचे घर भाडेतत्त्वावर दिले होते, मात्र काही कारणांमुळे त्यांनी ते परत घेतले. या प्रकरणावरून भाडेकरू प्रमोद पाटील याने संतापून घरमालक गलू पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात गलू पाटील गंभीर जखमी झाले.
या घटनेनंतर जखमीचे पुत्र विपुल गलू पाटील (वय ३८, रा. नशिराबाद) यांनी नशिराबाद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रमोद पाटील याच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. सी. मनोरे करीत आहेत.