भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ : अनेक जिल्ह्यांमध्ये चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांत हवा असलेला कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ आतंक इबादत अली इराणी याला भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपी सादिक अली हा महाराष्ट्रभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फरार होता.
भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी सादिक अली याच्या ठावठिकाण्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस स्टेशनमधील एका गुन्ह्यात तो गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता.
तपासादरम्यान समोर आले आहे की, आरोपी सादिक अली याने राज्याच्या विविध भागांत चैन स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. तो खालील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्ह्यांमध्ये फरार होता, जळगाव तालुका, जिल्हापेठ, चाळीसगाव शहर, चाळीसगाव ग्रामीण. वर्धा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, खामगाव, धुळे आणि संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर आणि जीवन कपडे यांचा समावेश होता.


