सावदा | प्रतिनिधी फैजपूर-मुक्ताईनगर बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील तब्बल २.६१ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारी २.५५ वाजण्याच्या सुमारास घडली.
चांगदेव (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी वंदना सुपडू बोदडे (वय ४८) या सावदा बसस्थानकावरून फैजपूर-मुक्ताईनगर बसने चांगदेवकडे प्रवास करत होत्या. बसमध्ये बसल्यानंतर अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ७.११० ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल व २४.७४० ग्रॅम वजनाचे मंगलपोत, असे एकूण ३१.८५० ग्रॅम वजनाचे (अंदाजे किंमत २,६१,८०७ रुपये) सोन्याचे दागिने चोरून नेले.
या घटनेनंतर वंदना बोदडे यांनी सावदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे करीत आहेत. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास सुरू केला आहे.