मुंबई- राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे इतर पर्यायांची आवश्यकता राहणार नाही, असं ते म्हणाले आहेत.
क्युरेटिव्ह पीटिशन दाखल करण्यात आली आहे. पण, आता त्याचा काही फायदा होणार नाही. कारण, सर्व मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता बाहेर कोणीच राहणार नाहीये. मागासवर्गातील सर्व लोक राजीनामा देत आहेत. कारण आता ओबीसीचा आयोग राहिलेला नाही तर मराठा आयोग झाला आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली.
तुम्ही निराश झाले आहे का, या प्रश्नावर उत्तर देताना भुजबळांनी सांगितलं की, ”अरे असंच चाललेला आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व लोक राजीनामा देत आहेत, तो आयोग आता ओबीसीचा राहिलेला नाही. तो मराठा आयोग झालेला आहे. जरांगेचा रोजचं काम आहे बोलणे, त्याच्याशिवाय त्याचं भाषण कोणी ऐकणार नाही. हरिभाऊ राठोड ओबीसीमध्ये फूट पाडण्यासाठी गेली कित्येक वर्षे काम करत आहे.”
”आता ज्याप्रमाणे दादागिरीने कुणबी सर्टिफिकेट घेतात, खोटी सर्टिफिकेट घेतात. तसेच पुढे सुद्धा होणार आहे. जात पडताळणीच्या वेळेलाही असेच होणार आहे. कोणी फोन करणार, कोणी दादागिरी करणार आणि जात पडताळणी करून घेणार, जर सर्व मराठा ओबीसीमध्ये येणार असतील तर, काय करायचं ओबीसीवर चर्चा घेऊन. सर्व सर्टिफिकेट घेत आहेत, त्यासाठी प्रयत्न सुरू आहे, न्यायमूर्ती शिंदे गावोगावी फिरवून सर्टिफिकेट द्या सांगत आहे. आता काही शिल्लक राहिलेले नाही, आता महाराष्ट्रात मराठा शिल्लक नाही, सर्व कुणबी झाले आहेत”, असं भुजबळ म्हणाले आहेत.