जळगाव ;- चभारदरी धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसोली शिवारात असलेल्या शामा फायर कंपनीमागील घडली आहे. यावेळी घटनास्थळी नातेवाईकांसह मित्रांनी आक्रोश व्यक्त केला.
सोनू उर्फ सोपान संजय महाजन (वय-१९, रा. शिरसोली ता.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. शेतीकाम करतो. शुक्रवारी १५ सप्टेंबर रोजी तो त्याच्या दोन मित्रासह चभारदरी धरणाजवळ गेले होते. यावेळी धरणाच्या काठावर काही वेळ बसल्यानंतर सोपान महाजन हा पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरला. धरणात चिखल असल्यामुळे उडी मारल्यानंतर तो फसला त्यामुळे त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. यामुळे घाबरलेल्या दुसऱ्या मुलाने आरडाओरड केली. गावातील काही मित्रमंडळी व ग्रामस्थांशी संपर्क साधून घटनेबाबत माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली सोनू महाजन याला धरणाबाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.
या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. मयत सोनू महाजनयांच्या मृत्यूची वार्ता कळताच त्याच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रुग्णालयात नातेवाईकांची गर्दी झालेली आहे सोनू महाजन याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.