लोकशाही संपादकीय लेख

चाळीसगाव शहरात राजकीय नेते, शिवसेनेचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी चाळीसगाव शहरातील पोलिसांच्या विरोधात आंदोलन दिनांक २७ जून रोजी केले. पोलिसांच्या विरोधात आक्रोश आंदोलन करताना उन्मेष पाटील यांनी विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात आगपाखड केली. विकासाचे राजकारण करण्याऐवजी स्टंटबाजीचे राजकारण मंगेश चव्हाण करतात, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. एका महिला पोलिसावर एक वर्षापासून अन्याय होतो आहे. त्याबाबतीत आमदार मंगेश चव्हाण कसलाही आवाज उठवत नाहीत. पण ज्या महिलांनी तक्रार नसताना स्टंटबाजी करून पीएसआयला बडतर्फ करण्याचे राजकारण केले, तसेच चाळीसगाव तालुक्यातील अधिकाऱ्यांनी जो अत्याचार सुरू केला आहे, त्या पोलिसांना खतपाणी घालण्याचा प्रकार आमदार मंगेश चव्हाण करीत आहेत. त्यांच्याकडून सर्वसामान्यांना न्याय मिळण्याची अपेक्षा नाही. म्हणून चाळीसगाव पोलिसांच्या विरोधात त्यांनी एक दिवसाचे आक्रोश आंदोलन केले.त्यानंतर उन्मेष पाटलांनी जळगावात परवा पत्रकार परिषद घेऊन पोलीस अत्याचाराच्या कथा व्यक्त केल्या. त्याला आपले आमदार मंगेश चव्हाण हे पाठीशी घालतात, असा आरोप केला. मुळात विकासाचे राजकारण करण्याऐवजी स्टंटबाजीचे राजकारण ते करतात, ही गोष्ट वाईट आहे. निवडणुका आल्या की काय राजकारण करायचे ते त्यांनी करावे; पण विकासात राजकारण नको, असा उन्मेष पाटील यांचा एकंदरीत मंगेश चव्हाणांवर आरोप होत आहे.
याचवेळी चाळीसगावात एक घटना घडली. ज्येष्ठ पत्रकार तथा टाकळीचे माजी सरपंच किसनराव जोर्वेकर हे जलतरण तलावावर पोहायला गेले असता तेथे त्यांचे कट्टर शत्रू, टाकळीचे माजी सरपंच अण्णा गवळी हे देखील पोहायला आले होते. त्या दोन शत्रूंमध्ये पोहण्याच्या ठिकाणी एकत्र आल्यानंतर जोर्वेकर यांनी व अण्णा गवळी यांनी एकमेकांविरुद्ध पाण्यात बुडवून जीवे मारण्याचा दावा केला. दोघांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्या. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्या तक्रारी दाखल करून घेतल्या आणि तलावाचा स्पॉट पंचनामा करायचा म्हणून दोघांनाही जलतरण तलावात नेऊन तेथे त्यांचा स्पॉट पंचनामा केला. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली व न्यायालयासमोर उभे केले. तेव्हा दोघांनाही न्यायालयीन कोठडी मिळाली आणि ते दोघे सध्या जळगावच्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. किसनराव जोर्वेकर हा उन्मेष पाटलांचा माणूस आहे. त्याला विनाकारण अटक झाली, असे त्यांचे म्हणणे आहे. तर जोर्वेकरांना अटक झाल्याचा आनंद चाळीसगावातील शेकडो पीडितांना झाला. त्यांनी उन्मेष पाटील यांच्या आक्रोश मोर्चाच्या ठिकाणी, सावकार चौकात, सर्व पीडित एकत्र येऊन जोर्वेकरांना अटक झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला. त्या ठिकाणी त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडून आनंद साजरा केला. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या किसनराव जोर्वेकर यांना पोलिसांनी अटक केली आणि त्यांना जेलमध्ये टाकले म्हणून ही सर्व मंडळी आनंदोत्सव साजरा करत होती. किसनराव जोर्वेकर यांनी अनेकांविरुद्ध काही कारण नसताना तक्रारी दाखल करून त्यांना जेरीस आणले होते. त्यामुळे एक प्रकारे त्रास कमी झाला म्हणून ही मंडळी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद साजरा करत होती. एखाद्याला अटक झाल्यानंतर त्याविषयी दुःख व्यक्त केले जाते; पण इथे आनंदोत्सव साजरा होतो, म्हणजे त्या व्यक्तीविरुद्ध किती जणांचा रोष असेल, हे लक्षात येते.
उन्मेष पाटलांनी आपल्या आक्रोश आंदोलनाच्या वेळी पीएसआय घुले यांच्या विरुद्ध अपशब्द वापरले. त्याबद्दल पीएसआय घुले यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नंतर बोलताना उन्मेष पाटील म्हणाले की, “मी शिवी द्यायला नको होती; पण भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली.” उन्मेष पाटील यांचे दुखणे वेगळेच आहे. एका बँक व्यवहारात त्यांचे जावई यांच्या विरोधात देवगिरी बँक, संभाजीनगर यांनी गुन्हा दाखल केला. ती बँक ही भाजप तसेच आरएसएसच्या लोकांची असल्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांनी फूस लावून हा गुन्हा दाखल करायला भाग पाडले, असे त्यांचे म्हणणे आहे. म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात काहीतरी करून आंदोलन करायचे, हे त्यांचे धोरण आहे. स्टंटबाजीचे राजकारण मंगेश चव्हाण करतात, हा आरोप अनेक वेळा झाला. तोच तोच आरोप पुन्हा पुन्हा केला जातो. आपण उद्धव ठाकरे सेनेतून एकनाथ शिंदे यांच्या सेनेत प्रवेश केला, त्याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपल्यावर ज्या काही केसेस आहेत त्या शिंदे सेनेत गेल्यामुळे खारीज होतील, असे त्यांना वाटते. तसेच सत्तेचा मग्रूरपणा वापरता येतो म्हणूनच शिंदे सेनेत प्रवेश केला नाही का? आपण दोघे महायुतीचे सदस्य असताना महायुतीचा नियम पाळायला नको का? सतत विकासाच्या नावावर स्टंटबाजीचा आरोप करणे हे बरोबर नाही. महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. तो उन्मेष पाटलांकडून पाळला जात नाही, हेही तितकेच खरे. पण चाळीसगावात पीडित जनतेने त्यांच्या आक्रोश मोर्चाविरुद्ध आनंदोत्सव मोर्चा काढून त्यांना चांगलेच उत्तर दिले आहे.


