
लोकशाही संपादकीय लेख
गेल्या चार-पाच दिवसापासून उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. साधारण 10 एप्रिल पासून ऊन हळूहळू वाढत चालले आहे. आणि एप्रिलच्या मध्याला म्हणजे 15 एप्रिल उन्हाचा पारा 47 अंश डिग्री सेल्सियस पर्यंत गेला आहे. म्हणजे मे महिन्याच्या आधीच एप्रिल महिन्यातच चटके जाणवायला लागले आहेत. अजून एप्रिल महिन्याचे पंधरा दिवस बाकी असताना हा पारा 42 अंशावर पोहोचला आहे. येत्या 20 एप्रिल पर्यंत हा पारा वाढतच जाणार असल्याचा इशारा देण्यात आला असून हा पारा 44 अंशापर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी या वाढत्या तापमानाची दखल घेण्याची गरज आहे. दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत आहेत. रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. रस्त्यावरची वर्दळ एकदम कमी होत आहे. आवश्यकते शिवाय कोणीही घराबाहेर पडता कामा नये तसेच कडक उन्हापासून घ्यावयाची काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. उन्हापासून संरक्षण करायचे सर्व काही उपाय प्रत्येकाने केलेच पाहिजे. भरपूर पाणी पिले पाहिजे. रिकाम्या पोटाने राहता कामा नये. पोटात काहीतरी खाल्ल्याशिवाय बाहेर पडू नये. कोणत्याही कामाची वेळ ही सकाळी दहा ते बाराच्या आतच ठरवावी किंवा सायंकाळी सहा वाजेनंतर कामासाठी बाहेर पडावे. अन्यथा उष्माघातासारखा प्रकार होण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिमेकडील उष्ण वारे वाहत असल्याने हवामान अत्यंत कोरडे राहते. त्यामुळे उष्ण वारे वाहून हवामानातील आर्द्रता कमी होते आहे. प्रत्येक जण कोरड्या हवामानापासून सुटका मिळवण्यासाठी थंडीच्या वस्तू वापरण्याचा प्रयत्न होतो आहे. थंड पाण्यासाठी माठाची मागणी वाढली आहे. निरनिराळी सरबत करण्यात येत असून ते घेतले जात आहे. फ्रिजचा उपयोग थंड पदार्थांसाठी केला जात आहे. एकंदरीत उन्हापासून स्वतःला वाचवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन केले जात आहे. निरनिराळ्या फळांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. सध्या बाजारात टरबूज मोठ्या प्रमाणावर आले आहेत. टरबुजाचे उत्पादन जास्त झाल्याने टरबूज यावेळी फार स्वस्त झाले आहेत. खरबूज, द्राक्ष, आंबा, चिकू, सफरचंद ही फळे बाजारात मोठ्या प्रमाणात आली आहेत. तसेच त्यांच्या दरातही घसरण असल्याने सर्वांना ते परवडणारे आहेत. जळगावची केळी बाजारात स्वस्त मिळत आहे. एकंदरीत उन्हाळ्यात जी जी फळे खायला हवीत त्यांची रेलचेल दिसते आहे हे विशेष होय..
जागतिक स्तरावर उन्हाचे चटके बसायला लागले आहेत. जळगाव जिल्ह्यात जिल्हा वगळता विदर्भ, नागपूर, वर्धा, अकोला, नांदेड येथे उष्णतेची लाट आली आहे. सध्या नागपूरचे तापमान 42 अंशाच्या पार गेले आहे. आज नांदेड जिल्ह्यातील देगलूर मध्ये 47 अंशाचे तापमान सर्वाधिक नोंदवले गेले तर अकोल्यात तापमानाचा पारा 44 अंशाच्या पार गेला. महाराष्ट्रात या दोन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाची नोंद केली गेली आहे. त्यामुळे अकोला, नांदेड सर्वात हॉटेस्ट शहर म्हणून ओळखले जात आहेत. अजून एप्रिल महिन्याचे पंधरा दिवस बाकी आहेत. पुढचे चार पाच दिवस तापमानात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान पारा 42 अंशांवरून 45 अंश होण्याची शक्यता आहे. हा वाढता पारा लक्षात घेऊन प्रत्येकाने आपापली काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. लिंबू सरबताचा वापर सर्वात जास्त झाला पाहिजे जेणेकरून आरोग्यास त्रास होणार नाही. लिंबू, पाणी आणि त्यात साखर घालून ते सरबत पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात आपल्याबरोबर आपण मुक्या प्राण्यांची काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. पक्षांसाठी ठिकठिकाणी परळ ठेवण्यात येत आहेत. तसेच फराळ ठेवून त्यात पाणी ठेवून द्यावे म्हणजे पक्षांसाठी ते पाणी फायदेशीर ठरेल. एप्रिल आणि मे महिना ही दोन महिने उन्हाळ्याचे आहेत. जास्तीत जास्त तापमानाला तोंड द्यावे लागणार आहे. उन्हापासून किंवा वाढत्या तापमानामुळे कसलाही धोका पत्करू नका. मुलांच्या शाळेंना सुट्ट्या आहेत. परंतु शाळा असतील तर सकाळची शाळा एक वेळेची ठेवली पाहिजे. लहान मुलांना उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. एकंदरीत ऊन वाढते आहे. उन्हाचे चटके जास्त जाणवत आहेत. उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी सर्व गोष्टी तुम्हाला करण्याची गरज आहे. जनावरांसाठी देखील पिण्याच्या पाण्याची ठिकठिकाणी व्यवस्था करणे आवश्यक आहे. माणसाला तहान लागली तर तो पाणी मागू शकतो परंतु मुके जनावर पाणी मागू शकत नाही पिण्याच्या पाण्याविना ते तडफडू शकतात. त्यात त्यांना मरणही ओढाऊ शकते हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे. कडक उन्हापासून सावध रहा, स्वतःच्या काळजी बरोबर इतरांची ही काळजी घ्या.. पुढच्या दीड महिन्यात रात्र वैऱ्याची आहे, असे समजून सावध रहा हेच या निमित्ताने सांगणे..!

