लोकशाही संपादकीय लेख

बायपास महामार्गावरील आसोदा रेल्वे पुलाचा काही भाग खचल्यामुळे तेथील एका बाजूची वाहतूक बंद असून सध्या एकतर्फी वाहतूक सुरू आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे प्रकरण गाजत असताना आणि निकृष्ट दर्जाचे काम झालेले असल्याचा शेरा असताना कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, असा एक प्रस्ताव आला होता. दीड महिना हे प्रकरण चालल्यानंतर आता काल त्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा अखेर दाखल झाला आहे. त्यांची जी काही पोलीस चौकशी होईल, ती होईल; पण आज तरी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाला ते योग्यच झाले. कारण कंत्राटदाराचे हात वरपर्यंत पोहोचलेले आहेत, असे अनेकांचे म्हणणे होते. त्याचबरोबर कंत्राटदाराकडून कमिशन घेणाऱ्या लोकप्रतिनिधींकडूनदेखील हा गुन्हा दाखल होणार नाही, असे बोलले जात होते. पण काही का होईना, जनतेच्या रेट्यापुढे कुणाचे चालले नाही. अखेर गुन्हा दाखल झाला. आता तपासातून जे निष्पन्न होईल ते होवो. असे असले तरी आज दीड-दोन महिने झाले, पुलाचे नादुरुस्त काम दुरुस्त झालेले नाही. त्यामुळे एकतर्फी वाहतूक करण्यात येत आहे. त्याचा परिणाम जळगाव शहरातील महामार्गावरील वाहतूक कोंडीवर होतो आहे. परिणाम म्हणून अपघात वाढले आहेत. आतापर्यंत दीड ते दोन महिन्यांत पाच जणांचा बळी गेला आहे. त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न प्रत्येक नागरिक विचारतो आहे.


