भरधाव कारची धडक; ७४ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी
रामेश्वर कॉलनीत घडली घटना

जळगाव – शहरातील रामेश्वर कॉलनीत भरधाव वेगाने येणाऱ्या कारने ७४ वर्षीय वृद्धाला जोरदार धडक दिल्याची घटना १० मार्च रोजी रात्री घडली. या अपघातात वृद्ध गंभीर जखमी झाले असून, संबंधित कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामेश्वर कॉलनीतील चंदनगीर शंकरगीर गोसावी (वय ७४) हे घराजवळील सुनंदा किराणा दुकानाजवळून जात असताना अचानक एका भरधाव कारने त्यांना धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर जोरात आपटले आणि त्यांच्या डाव्या पायाच्या कमरेजवळ गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावर थांबण्याऐवजी तिथून फरार झाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमींना मदत केली आणि रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी चंदनगीर गोसावी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करत आहेत.


