पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क
पाचोरा आगारातुन निघालेली पाचोरा ते वडगाव कडे या बसला ट्रॅक्टरने कट मारल्याने रस्त्याच्या कडेला घसरली. या अपघातात कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी पुढील होणारा अनर्थ निश्चित टळला आहे.
पाचोरा आगारातुन २२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता प्रवाशी व विद्यार्थी घेवुन बस क्रमांक एम. एच. १४ बी. टी. २६११ ही पाचोरा ते वडगांव कडे च्या दिशेने निघाली. मोंढाळे ते निंभोरी गावा दरम्यान निंभोरी गावच्या माजी सरपंच मिनाक्षी विनायक दिवटे यांच्या गट क्रमांक २७ नजीक शेताजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने बसला कट मारला. यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात घसरली.
सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवीतहानी झाली नसली तरी पुढील अनर्थ टळला. बस चालकास स्टेरींग फिरल्याने हाताला इजा झाली आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत बसच्या काचा फोडुन आत अडकलेल्या प्रवाशी व विद्यार्थ्यांना अर्जुन राठोड, भगवान नलावडे, सागर पाटील, रामराव दिवटे, कोतवाल महेंद्र राऊतराय, सागर मोरे सह अनेकांनी प्रवास यांना सुखरूप बाहेर काढले. अपघात झाल्यानंतर सुमारे अर्धातास वाहतुकीस खोळंबा झाला होता. पाचोरा ते सातगाव (डोंगरी) रस्त्याचे काम सुरू असल्याने साईड पट्टीवर माती असल्याने बस घसरली. सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढून क्रेनच्या साहाय्याने बस काढण्यात आली. अपघात घडला त्यावेळी बसमध्ये ५० प्रवाशी व विद्यार्थी होते. घटनेची माहिती मिळताच पाचोरा आगाराचे व्यवस्थापक प्रकाश पाटील यांचेसह अनेकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची विचारपूस केली.

