लोकशाही न्यूज नेटवर्क

बल्लारपूर पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे २३ लाख ७४ हजार १०० रुपयांच्या घरफोडीचा यशस्वी उलगडा करत दोन मुख्य आरोपींसह चोरीचा माल खरेदी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या ऐवजापैकी सुमारे २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिवाजी वॉर्ड येथील रहिवासी राजवीरसिंह धनसिंह सनवाल (वय ६०) यांच्या घरात २७ जून २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोने, चांदी व इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्या होत्या. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रोहित कनाई मंडल (रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने शुभम जयसिंग उईके याच्या साथीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर शुभम उईके यालाही अटक करण्यात आली. आरोपींनी चोरीचा उर्वरित माल अब्दुल हमीद कादीर शेख, गन्नी उर्फ जनार्धन रमेश सोनी, संजू चंदेश्वर सोनी, राजेश महेश सोनी आणि हनमंत जगन्नाथ बाबर यांना विकल्याचे सांगितले. त्यानुसार या पाचही जणांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चोरीचा माल खरेदी केल्याप्रकरणी त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या नेतृत्वात पार पडली. तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अल्पावधीत गुन्ह्याचा उलगडा करून सुमारे २१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.


