भुसावळ : तालुक्यातील फुलगाव येथील एका कंपनीच्या शेडमध्ये घरफोडी करून पेव्हर ब्लॉक निर्मितीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी साचे, लोखंडी पत्रे, पाइप आदी साहित्य असा 1 लाख 54 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुलगाव येथील एम अँड जे फ्युचर जीनियस ओपीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या शेडमध्ये 27 जुलै रोजी रात्री ते 28 जुलै रोजी सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चोरी केली. चोरट्याने शेडचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत पेव्हर ब्लॉक तयार करण्यासाठी वापरले जाणारे विविध प्रकारचे लोखंडी साचे, लोखंडी पत्रे आणि लोखंडी पाइप असा एकूण 1 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी कंपनीच्या प्रतिनिधी ज्योती महेंद्र पाटील (वय 30, रा. फुलगाव, ता. भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ तालुका पोलीस करीत आहेत.


