बुलढाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क
बुलढाण्यातील खामगाव ते नांदुरा महामार्गावर आमसरी फाटा येथे आज सकाळी भीषण अपघात झाला. बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला असून यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १० ते १५ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची आहे. बस आणि विटा वाहतूक करणाऱ्या वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेत पोलिसांना पाचारण केले. नागरिकांनी जखमींना तात्काळ जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी पाठवले. पोलीस घटनास्थळी पोहचले असू मदतकार्य सुरू आहे.
बस आणि विटा वाहतूक करणारे ही दोन्ही वाहने प्रचंड वेगात होती. धडक इतकी जोरदार होती की बस आणि वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर रस्त्यावर काचांचा खच पडला. रस्त्यावर विटा पसरल्या होत्या. जखमी प्रवाशांचा आक्रोश आणि गोंधळामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या अपघाताची माहिती मिळताच खामगाव पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने खामगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल आले. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.