चोपडा येथील बीएसएफ जवान शहीद
पार्थिवावर १७ मार्च रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार
चोपडा प्रतिनिधी ;- मणिपूरमध्ये कर्तव्य बजावत असताना शहरातील गुर्जर आळी भागातील रहिवासी आणि सीमा सुरक्षा दलाचे (BSF) जवान चेतन पांडुरंग चौधरी (वय ३५) हेअपघातात शहीद झाले. त्यांच्या तुकडीच्या वाहनाचा ११ मार्च रोजी भीषण अपघातामध्ये ते गंभीर जखमी झालेल्या चेतन चौधरी यांनी १५ मार्चच्या पहाटे अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर १७ मार्च रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली.
मणिपूर राज्यातील अति संवेदनशील भागात बीएसएफच्या ३७ बीएन तुकडी कार्यरत होती. ११ मार्च रोजी इंफाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावर कांगपोकपी जिल्ह्यातील चांगभुंग गावाजवळ जवानांचे वाहन दरीत कोसळले. या अपघातात तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जवान जखमी झाले. चेतन चौधरी हे देखील गंभीर जखमी होते. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र १५ मार्च रोजी पहाटे ५ वाजता त्यांनी मृत्यूशी झुंज गमावली.
चेतन चौधरी यांनी १२ वर्षे सीमा सुरक्षा दलात सेवा बजावली होती. त्यांचे कर्तव्यनिष्ठ जीवन आणि अपघाती निधनाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
चेतन चौधरी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.शहीद चेतन चौधरी यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार असून, १७ मार्च रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.