लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्ह्यातील तरसोद ते पाळधी दरम्यान महामार्गावरील आसोदा येथील पूल खचल्यामुळे या महामार्गावरील बायपासची पूर्ण वाहतूक जळगाव शहरातून हलविण्यात आली आहे. सुमारे एक वर्षसुद्धा पूर्ण झाले नाही, पण या नवीन महामार्गाच्या पुलाला तडे गेल्याने ही वाहतूक जळगाव शहरातून वळवण्यात आली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील कालिंका माता चौक, आकाशवाणी चौक येथे वाहनांची फार मोठी कोंडी होताना दिसून येत आहे. कालिंका माता चौकात रस्त्याच्या एका बाजूने काम चालू असल्यामुळे कालिंका माता चौक ते अजिंठा चौकापर्यंत वाहतूक एकेरी होत असल्याने वाहतुकीची फार मोठी कोंडी होत आहे. त्याचबरोबर आकाशवाणी चौकात रात्री बारा वाजेपर्यंत चारही बाजूंनी वाहतूक होत असल्याने तेथे जबरदस्त वाहतूक कोंडी होते. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने आणि मागील दोन ते तीन दिवसांपासून जळगाव शहरात धुवाधार पाऊस असल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीची फार मोठी कोंडी झाली.
एक वर्षापूर्वीच या तरसोद-पाळधी महामार्गाचे उद्घाटन झाले होते. अजून एक वर्षसुद्धा या नव्या कामाला झाले नसताना आसोदा येथील पुलाचे बांधकाम खचल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एवढ्या लवकर हा पूल खचण्यामागचे कारण काय, याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न झाला असता पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हा पूल खचला कसा, याबाबत अनेकांनी वेगवेगळी मते व्यक्त केली आहेत. एक तर कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे काम निकृष्ट झाले. त्याचा परिणाम म्हणून या पुलाला तडे गेले. जर कंत्राटदार आपली बाजू सुरक्षित करण्याकरिता कामाचा दर्जा उत्तम झाला आहे, असे म्हणतात, एकंदरीत कंत्राटदाराच्या निकृष्टपणामुळे पुलावर हे दिवस आले, हे तितकेच खरे आहे.
याचा तपास करण्याकरिता दिल्लीची टीम जळगावला येऊन गेली. त्या टीमचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. तत्पूर्वी विविध लोकांच्या वतीने विविध प्रकारची टिप्पणी करण्यात येत आहे. सर्वात जास्त टार्गेट करण्यात येते ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना. अव्वाच्या सव्वा कमिशन खाण्यामुळे हे दिवस पहावे लागत आहेत. कमिशनबाजीमुळे कंत्राटदाराला रान मोकळे झाले. त्याला कोणी जाब विचारला, हा खरा प्रश्न आहे. नहीचे अधिकारी कानावर हात ठेवतात. आम्ही योग्य पद्धतीने त्याचे निरीक्षण केले आहे, पण नहीच्या अधिकाऱ्यांनीही कमिशनबाजीत आपले हात ओले केले असल्यामुळे ते स्पष्टपणे बोलू शकत नाहीत. म्हणजे ज्या संस्थेने, म्हणजेच नहीच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदारावर जे वर्चस्व हवे होते, ते वर्चस्व कमिशनमुळे राहिले नाही. म्हणजे नहीच्या अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले, तसेच पालकमंत्र्यांचा जो दबाव पाहिजे होता, तो कमिशनमुळे राहिला नाही. त्यामुळे कंत्राटदाराला रान मोकळे झाले.
आता पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणतात, कामाला एक वर्षही पूर्ण झाले नाही, त्यातच हा पूल खचला. त्यासाठी कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा. कंत्राटदारावर गुन्हा दाखल व्हायला हवा, म्हणण्यापेक्षा पालकमंत्र्यांना कुणी अडवले आहे का, की फौजदारी गुन्हा दाखल करू नका? स्वतः पालकमंत्री फौजदारी गुन्हा दाखल का करू शकत नाहीत किंवा अन्य कुणाला गुन्हा दाखल करायला का लावत नाहीत, हा खरा प्रश्न आहे. त्यामुळे फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे म्हणून आपली जबाबदारी झटकता येणार नाही. दुसरे मंत्री गिरीश महाजन यांना तर माहीतच नव्हते. त्यांना माहीत पडले, तर ते म्हणतात की, मी प्रत्यक्ष… एकंदरीत आरोप-प्रत्यारोपाने काय चालणार नाही. त्यातूनच काहीतरी रिझल्ट मिळाला पाहिजे. रिझल्ट घेणारे मंत्री जर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला हवा वगैरेची भाषा बोलत असतात, तर कसे काय चालेल? त्या लोकांचा दबाव वाढला पाहिजे. त्यासाठी आंदोलन उभे राहिले पाहिजे. तरच ही मंडळी ठिकाणावर येऊ शकते.
आज बायपासची वाहतूक सर्व जळगाव शहरातून वळविल्याने अनेक भागात अपघात व वाहतूक कोंडी होऊन लोकांचा जो वेळ वाया जातो, त्याचे काय? आता दिल्लीची टीम जळगावला येऊन गेली. त्यांचा अहवाल केव्हा येतो, देव जाणे. तोपर्यंत पुलाचे दुरुस्तीचे काम होणार नाही आणि जोपर्यंत तरसोद-पाळधी महामार्गावरील वाहतूक सुरळीत होणार नाही, तोपर्यंत जळगाव शहरातून ही वाहतूक जाईल. तोपर्यंत जळगावकरांच्या डोक्याला अपघात व वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. आता तातडीने हा महामार्ग कसा सुरळीत, लवकरात लवकर होईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत, ही अपेक्षा.


