१० हजारांची लाच मागणारा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता एसीबीच्या जाळ्यात

0

१० हजारांची लाच मागणारा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता एसीबीच्या जाळ्यात

धरणगाव (प्रतिनिधी) : पंचायत समिती धरणगाव येथे ग्रामीण गृहनिर्माण विभागातील अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३२) आणि त्याचा साथीदार सागर कोळी या खाजगी व्यक्तीने प्रधानमंत्री आवास योजनेचा (ग्रामीण) दुसरा हप्ता जमा करून देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या माहितीनुसार तक्रारदारास २०२४–२५ मध्ये परकुल मंजूर झाला होता. पहिला हप्ता १५ हजार रुपये खात्यात जमा झाल्यानंतर त्यांनी घराचे काम पूर्ण केले होते. मात्र दुसरा हप्ता न मिळाल्याने त्यांनी पंचायत समितीत चौकशी केली असता अभियंता पाटील यांनी “निधी उपलब्ध नाही” असे सांगितले. त्यानंतर गावातील नागरिकांकडून दुसरा हप्ता मंजूर झाल्याचे समजताच तक्रारदार ८ जुलै २०२५ रोजी पुन्हा पंचायत समितीत गेले. तेव्हा अभियंता पाटील यांनी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

तक्रारदाराने १४ जुलै रोजी एसीबीकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. पडताळणीदरम्यान अभियंता पाटील यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. सागर कोळी मार्फत ही रक्कम स्वीकारली जाईल, अशी कबुलीही अभियंत्याने फोनवर दिल्याचे निष्पन्न झाले.

या आधारे धरणगाव पोलिस स्टेशनमध्ये गु.क्र. ३९१/२०२५, प्रकरण प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अंतर्गत दिनांक ०४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कारवाईत सहभागी अधिकारी:
पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, निरीक्षक हेमंत नागरे, पो.ना. बाळू मराठे, राकेश दुसाने, प्रणेश ठाकूर आणि सचिन चाटे यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.