लोकशाही न्यूज नेटवर्क
शाळेत होणाऱ्या धावण्याच्या स्पर्धेसाठी सराव करत असतांना खाली कोसळून एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. हार्ट अटॅकमुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे. मोहित चौधरी असं या मुलाचे नाव असून तो शुक्रवारी सकाळी अलिगढ जिल्ह्यातल्या सिरौली गावामध्ये ही घटना घडली. या मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहित चौधरी आपल्या मित्रांसोबत धावण्याचा सराव करत होता. धावत असताना तो जमिनीवर कोसळला. मोहितची प्रकृती बिघडल्याची माहिती त्याच्या मित्रांनी कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत मोहितला तात्काळ रुग्णालयात हलवले. पण डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले.
मोहितच्या शाळेमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ७ तारखेला ही स्पर्धा होणार होती. पण या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वीच त्यांचा सराव करताना मृत्यू झाला. मोहितच्या वडिलांचा ऑगस्ट महिन्यांमध्येच रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाला होता. वडिलांनंतर मुलाचा देखील मृत्यू झाल्यामुळे मोहितच्या आईला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये अशीच एक घटना घडली होती. या घटनेत २० वर्षांच्या तरुणीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये गेल्या २५ दिवसांत ३ जणांनी हार्ट अटॅकने आपला जीव गमावला आहे. लोधीनगरमध्ये एका ८ वर्षांच्या मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. तर कामाला जाण्याासाठी निघालेल्या डॉक्टरचा देखील हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता.