बूस्टर डोसची वाट पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

कोरोनाची देशात आलेली तिसरी लाट अजूनही कायम आहे. दररोज अडीच लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. देशातील बहुतांश नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. तर दोन्ही डोस घेतलेले नागरिक आता बूस्टर डोसची वाट पाहत आहेत.

सध्याच्या घडीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि गंभीर आजारांचा सामना करत असलेल्या ६० वर्षांवरील व्यक्तींना बूस्टर डोस दिला जात आहे.

बूस्टर डोसबद्दलच्या धोरणावर सरकार पुनर्विचार करू शकतं. इतर वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस न देण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. तसेच तिसऱ्या डोसचा नेमका फायदा काय याबद्दल तज्ज्ञांच्या मनात शंका आहे.

आरोग्य कर्मचारी आणि आधीपासूनच एखाद्या गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या ६० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींना सध्याच्या लसीकरण धोरणानुसार बूस्टर डोस दिला जाईल असं वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. ‘बूस्टर डोसचा पुनर्विचार करावा लागेल. धोरणात बदल करण्याचा निर्णय सखोल अभ्यासानंतर घ्यावा लागेल. ज्या देशांमध्ये तिसरा डोस देण्यात आला आहे, तिथे त्याचे तितकेसे फायदे दिसलेले नाहीत,’ असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

लसीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट आणि जागतिक आरोग्य संघटना यांची मंगळवारी एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात बूस्टर डोसबद्दल सविस्तर चर्चा झाली. राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गट आणि जागतिक आरोग्य संघटनेनं बूस्टर डोस देण्यात आलेल्या देशांमधील आकडेवारीचं मूल्यांकन केलं. याशिवाय स्थानिक आकडेवारीचादेखील अभ्यास केला.

Leave A Reply

Your email address will not be published.