महाराष्ट्रातील विविध बोली असलेल्या ग्रंथाचे प्रकाशन राज्यपालांच्या हस्ते संपन्न…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

महाराष्ट्रातील ५७ बोलीतील ५७ कथा असलेल्या विविधबोलींचा अभ्यास असलेल्या डॉ. मोनिका ठक्कर यांनी संपादित केलेल्या “माझी बोली माझी कथा”  या पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मंगळवारी दि. 4 एप्रिल रोजी मुंबईतील राजभवन येथे झाले. खान्देशातील साहित्यिकांच्या कथांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक प्रांतात बोली या विषयी अभ्यास होणे गरजेचे आहे आणि ते ग्रंथ स्वरुपात असल्यास ते पुढच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल आणि आपल्या मातृभाषेचा सार्थ अभिमान आपण बाळगायला हवा असे प्रतिपादन करून या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांनी डॉ. मोनिका ठक्कर यांचे या प्रसंगी विशेष कौतुक केले. या प्रसंगी प्रकाशन संस्थेचे सदस्य उपस्थित होते.

प्राथमिक शिक्षक एकनाथ गोफणे यांच्या बंजारा गोरबोली भाषेतील ‘चाचा डोकरा’ कथेचा या पुस्तकात समावेश करण्यात आलेला आहे. यापूर्वीही आधुनिक लोकनाट्ये या संपादित ग्रंथामध्ये एकनाथ गोफणे यांनी लिहिलेले वगनाट्य प्रसिद्ध झालेलं आहे.

आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या विविध बोली बोलल्या जातात, ज्या आज नामशेष होत चालल्या आहेत. या बाबतचा विचार करून बोलींचे जतन आणि संवर्धन व्हावे या दृष्टीने तसेच वाचकांना ते रंजक वाटावे या उद्देशाने आपल्या महाराष्ट्रात बोलल्या जाणार्‍या बोली याचे ज्ञान जनसामान्य, महाविद्यालय व विद्यालय स्तरावरही विद्यार्थ्यांना मिळावे, बोलींच्या अभ्यासाकडे कल वाढावा या हेतूने महाराष्ट्रातील विविध बोलीतील कथा संकलित करून सोबतच त्याचा कथासार, कठीण शब्दांचे अर्थ, त्या-त्या बोली विषयी अभ्यासपूर्ण माहिती तसेच लेखकांचा थोडक्यात परिचय अशा धाटणीचा हा ग्रंथ आहे.

सदर ग्रंथात ५७ बोलीतील ५७ कथा असून प्रत्येक कथा त्या-त्या बोलीतील अभ्यासक लेखकांनी लिहिल्या आहेत. दिग्गज लेखक मंडळींनी या ग्रंथाला आपले योगदान देऊन समृद्ध केले आहे. बोलीविषयक असा प्रयोग महाराष्ट्रात प्रथमच या ग्रंथाच्या रूपाने झाला आहे. माझी बोली माझी कथा असे या ग्रंथाचे नाव असून, या ग्रंथाचे प्रकाशन लोकायन प्रकाशन संस्था यांनी केले आहे.

आजवर संशोधनात्मक लेखन आणि संपादन केलेल्या १२ ग्रंथांचा अनुभव पाठीशी घेऊन महाराष्ट्रातील विविध बोलीतील सदर अभ्यासपूर्ण ग्रंथाचे संकलन, संपादन आणि समन्वयाची भूमिका डॉ. मोनिका ठक्कर यांनी सांभाळली आहे.

खान्देशातील जवळपास लेखकांच्या कथांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे.

एकनाथ गोफणे – बंजारा गोरबोली.

डॉ. योगिता पाटील – अहिराणी बोली

संतोष पावरा – आदिवासी पावरी बोली

डॉ. वाल्मीक आहिरे – चांभारी बोली

रमजान तडवी- तडवी भिल्ल बोली

विश्वास पाडोळसे – तावडी बोली

सुनील गायकवाड – भिलाऊ बोली

अरविंद नारखेडे – लेवागणबोली

एस.के.पाटील- बागलाणी बोली

प्रविण पवार – वाघारी बोली

विश्राम वळवी – देहवाली

प्रा रमेश राठोड – लोहारी/धेडगुजरीबोली

या खान्देशातील बोलीभाषिक लेखकांचाही समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.