जळगाव : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नामांकित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स या दागिन्यांच्या शोरूममध्ये भरदिवसा धाडसी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने सुमारे २ लाख ४९ हजार ६१५ रुपये किमतीची २२ कॅरेट सोन्याची चैन चोरून नेल्याची बाब समोर आली आहे.
ही घटना ९ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ५ ते ५.२५ वाजेदरम्यान घडली. शोरूममध्ये ग्राहकांची वर्दळ सुरू असताना, संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने कोणाचीही संमती न घेता लबाडीच्या इराद्याने सोन्याची चैन लंपास केली. चोरीचा प्रकार लक्षात येताच शोरूममध्ये एकच खळबळ उडाली.
याप्रकरणी शोरूमचे मॅनेजर गणेश राजाराम काळे (वय ४९, रा. अयोध्या नगर, जळगाव) यांनी १९ जानेवारी रोजी शनिपेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून, त्यानुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
चोरीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक कावेरी एम. कमलाकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीराम बोरसे करत असून, शोरूममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून चोरट्याचा कसून शोध घेतला जात आहे.