लोकशाही न्यूज नेटवर्क

लातूरमधील उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे. अनैतिक संबंध आणि प्रॉपर्टी नावावर करण्याच्या वादातून एका महिलेने २४ वर्षीय तरुणाच्या तोंडावर उकळते तेल टाकून त्याला गंभीर जखमी केले. या दुर्घटनेत गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
स्थानिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण उद्धव दहीकांबळे (वय २४ वर्षे) आणि आरोपी महिला वंदना मादळे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात प्रॉपर्टी नावावर करण्यावरून तीव्र वाद सुरू होता. दोघांमध्ये दररोज खटके उडत होते.
उद्धव आणि वंदना यांच्यातील हाच वाद विकोपाला गेला. त्यामुळे संतापलेल्या वंदना मादळे हिने उद्धव दहीकांबळे यांच्या तोंडावर थेट उकळते तेल ओतले. या जीवघेण्या हल्ल्यात उद्धव गंभीररित्या भाजले गेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या धक्कादायक प्रकारानंतर उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने पावले उचलत आरोपी महिला वंदना मादळे हिला ताब्यात घेतले असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या प्रकरणानंतर लातूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास करत आहेत.


