
चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आचार्य डिगंबरजी पांडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरात चौथ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या ‘सजीव सिद्धी प्राकृतिक चिकित्सा शिबिराला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शिबिराच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी नैसर्गिक उपचार पद्धतीचा लाभ घेत आरोग्यात लक्षणीय सुधारणा अनुभवली आहे.
या शिबिरात शरीरशुद्धी, योग्य आहार-विहार, योग, प्राणायाम, जलोपचार, माती उपचार आणि विविध नैसर्गिक उपचार पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. पोटाचे विकार, बद्धकोष्ठता, स्थूलता, मधुमेह, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, त्वचारोग आणि इतर जीवनशैलीशी संबंधित समस्यांमध्ये सहभागी नागरिकांना चांगला लाभ होत असल्याचे अनुभवातून दिसून आले आहे. आचार्य डिगंबरजी पांडुळे यांनी सांगितले की, “निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारल्यास अनेक आजारांवर औषधांविना नियंत्रण मिळवता येते. योग्य आहार, उपवास, योग आणि प्राकृतिक चिकित्सा यांच्या साहाय्याने शरीर स्वतःची उपचारशक्ती जागृत करते.”
शिबिरात सहभागी झालेल्या अनेकांनी अल्पावधीतच आरोग्यात सकारात्मक बदल जाणवल्याचे सांगितले. त्यामुळे या शिबिराबद्दल नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन नियमितपणे करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. चाळीसगाव शहरातील या उपक्रमामुळे प्राकृतिक चिकित्सा आणि आरोग्याविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात होत असून, अधिकाधिक नागरिक नैसर्गिक आरोग्यपद्धतीकडे वळताना दिसत आहेत.

